पुलाची शिरोली / वार्ताहर
हातकणंगले पंचायत समिती सभापती डॉ. प्रदिप पाटील यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल पाटील यांचेकडे सादर केला आहे. यावेळी शिरोली ग्रामपंचायत सदस्य सलिम महात, डॉ. सुभाष पाटील आदी उपस्थित होते.
हातकणंगले पंचायत समितीमध्ये आमदार प्रकाश आवाडे, आमदार डॉ. विनय कोरे व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या गटाची सत्ता आहे. गेल्या कांही महिन्यांपूर्वी आमदार कोरे गटाचे टोप येथील डॉ. प्रदिप पाटील यांना सभापती पदासाठी संधी देण्यात आली होती. त्यांनी गटातंर्गत ठरलेल्या नियमानुसार गुरुवारी राजीनामा दिला आहे. त्यानंतर रोटेशन पध्दतीने सभापती पदाची संधी महाडिक गटातील सदस्यास देण्याचे सर्वानुमते ठरले आहे.
त्या अनुषंगाने पुलाची शिरोलीतील भारतीय जनता पक्षाच्या सदस्यां डॉ. सौ. सोनाली सुभाष पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. सध्या आवाडे गटाचे सहा, महाडिक व हाळवणकर (भाजप) गटाचे पाच व कोरे गटाचे पाच असे मिळून २२ पैकी १६ सदस्य आहेत. तर शिवसेना दोन, स्वाभिमानी शेतकरी संघटना दोन व राष्ट्रीय काँग्रेस एक व भाजपचे नाराज सदस्य एक असे बलाबल आहे. हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव बाजार समितीच्या निवडणुकीत आवाडे, महाडिक , कोरे , स्वाभिमानी शेतकरी संघटना, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर गट एकञीत आहेत.
मागील सभापती निवडीवेळी या सर्व नेत्यांनी ठरवल्याप्रमाणे निवड केल्यास पुलाची शिरोलीत भारतीय जनता पक्षाच्या सदस्या डॉ. सोनाली पाटील यांना अवघे तीन महिने सभापती पदाची संधी मिळणार आहे. तीस वर्षांपूर्वी माजी खासदार बाळासाहेब माने गटाचे शंकरराव पाटील (टोपकर) हे सभापती झाले होते. त्यानंतर शिरोलीच्या इतिहासात पहिल्यांदाच हातकणंगले पंचायत समिती ‘ महिला’ सभापती पदाचा बहुमान सौ. सोनाली पाटील यांच्या रुपाने मिळणार आहे.