प्रतिनिधी / हातकणंगले
हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व निरीक्षक अशोक भवड यांनी हातकणंगले पोलीस ठाणेअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये २२ मार्चपासून संचारबंदी काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावत उनाडक्या करत फिरणाऱ्या २९ मोटरसायकल स्वारावर गुन्हे दाखल करून दुचाकी जप्त केल्या आहेत. हातकणंगले पोलीस दलामुळे २१ गावे व ४ ते ५ वाडयावस्त्यामध्ये पेट्रोलिंगद्वारे बंदोबस्त चोख ठेवल्याने गर्दी न होता गावामध्ये कडक शिस्तीमुळे कडकडीत गावबंद सुरू आहे. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्ग फैलाव रोखण्याचे ते उत्कृष्ट कर्तव्य बजावत आहेत.
पोलीस निरीक्षक अशोक भवड पत्रकारांशी संवाद साधतांना म्हणाले, पोलीस ठाणेअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये गस्त घालण्यासाठी पन्नास पोलीस कर्मचाऱ्यांचे पाच ग्रुप करून चोवीस तासांमध्ये गस्तचे कार्य सुरू आहे. तीन पॉईंट नियोजीत करून परजिल्ह्यातील लोकांचा आपल्या जिल्ह्यात प्रवेश होऊ नये यासाठी पहिला पॉईंट कोल्हापूर -सांगली सीमा दूधगांव -कुंभोज येथे आहेत. दुसरा पॉईंट एस. टी. स्टॅन्ड हातकणंगले येथेआहे . तिसरा पॉईंट ज्यांना होम क्वारंटाईन बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह व रघुजानकी हॉल हातकणंगले येथे केले आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत .
हातकणंगले पोलीस लोकांना घराबाहेर पडू नका, गर्दी टाळा ,वारंवार हात स्वच्छ साबणाने धुवा, सॅनिटायझर व मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्स ठेवा, जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या वेळी एक मिटर डिस्टन्स ठेवा असा संदेश देत कोरोना विषाणूचा संसर्ग फैलाव रोखण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक दरेकर व पोलीस उपनिरीक्षक सुर्यवंशी व पन्नास पोलीस कर्मचारी यांच्या साथीने आहोरात्र कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या शिस्तबद्ध व नियोजनबद्ध कोरोना महामारी विषाणू संसर्ग फैलाव रोखण्याच्या कार्याबद्दल जनमानसात हातकणंगले पोलीस दलाबद्दल आत्मियता निर्माण झाली आहे.