अचानक आलेल्या परप्रांतीय नागरिकांमुळे प्रशासनाची दमछाक
हातकणंगले /प्रतिनिधी
हातकणंगले बस स्थानकात आज सकाळी सात वाजता अचानक हातकणंगले परिसरामधील चारशेहून अधिक परप्रांतीय कामगारांनी ठिय्या मांडल्याने प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली. यावेळी पोलिस प्रशासनाने तात्काळ जयसिंगपूर येथील अतिरिक्त पोलीस फाटा मागून या गर्दीवर नियंत्रण आणले.
मिळालेल्या माहितीनुसार हातकणंगले नगरपंचायत मार्फत काल साडेसहाशे परप्रांतीयांना आपापल्या गावी सोडण्यासाठी हातकणंगले बस स्थानकातून कोल्हापूरला एसटी महामंडळामार्फत गाड्या सोडण्यात आल्या होत्या याची खबर मिळताच अनेक परप्रांतीयांनी विनापरवाना बस स्थानकात येऊन ठिय्या मांडला व आम्हालाही आमच्या गावी जाण्यासाठी गाड्या उपलब्ध करा म्हणून अट्टहास धरला. त्यामुळे काही काळ वातावरण तणावग्रस्त झाले. लगेच तात्काळ पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घटना स्थळी धाव घेत या परप्रांतीय कर्मचाऱ्यांच्या जमावाला शांत केले व ज्या त्या ठिकाणाहून हे मजूर आले होते त्या त्या ठिकाणी परत त्यांना स्कूल बस द्वारे सोडण्यात आले. मात्र काही काळ हातकणंगले बस स्थानक परिसरामध्ये चांगलीच गर्दी झाली होती.
यावेळी तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी प्रत्यक्ष भेट दिली. जयसिंगपूरचे डीवायएसपी किशोर काळे यांनीही स्वतः घटनास्थळी उभा राहून प्रत्येक कामगाराला ज्या त्या ठिकाणी पोहोचवण्याची जबाबदारी पार पडली. यावेळी जवळपास शंभर पोलिसांचा ताफा मागवण्यात आला होता, तसेच हातकणंगले नगरपंचायतीचे नगरसेवक, नगराध्यक्ष यांनीही पुढाकार घेऊन परप्रांतीय कामगारांची गैरसोय होणार नाही याकडे लक्ष दिले व त्यांना आपापल्या ठिकाणी पोहोचवले.