प्रतिनिधी/हातकणंगले
वारंवार रस्त्यावर येऊन वाहतुकीला अडथळा करणाऱ्या मनोरुग्णाबाबत हातकणंगले पोलिस ठाण्यात येत असलेल्या तक्रारीमुळे अस्वस्थ झालेल्या हातकणंगले पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने या मनोरुग्णाला काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत हा रुग्ण गंभीर जखमी झाला. याबाबतची तक्रार बजरंग दलाचे तालुका उपाध्यक्ष महेश कोरवी यांनी थेट जिल्हा पोलीस प्रमुखाकांकडे केली आहे. मात्र संबंधित मनोरुग्ण गायब असून त्याचा थांगपत्ता लागत नसल्याने खळबळ उडाली आहे. तो मनोरुग्ण गेला कुठे याबाबतची उलटसुलट चर्चा परिसरात सुरू आहे
अधिक माहिती अशी, इचलकरंजी कोल्हापूर मार्गावरील साजणी येथील नवमहाराष्ट्र सूतगिरणी जवळ एक मनोरुग्ण गेले दोन दिवस सातत्याने रस्त्यावर येत होता. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होऊन त्याच्या जीवालाही धोका निर्माण झाला होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती हातकणंगले पोलिसांना दिली. मात्र बेफिकीर हातकणंगले पोलिसांकडून नेहमीप्रमाणे याकडेही दुर्लक्ष केले गेले. मात्र सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर पोलीस घटनास्थळी गेले. यावेळी या मनोरुग्णाला ताब्यात घेण्याऐवजी त्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याने थेट मनोरुग्णाला काठीने बेदम मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला.
यावेळी स्थानिकांनी त्या संबंधित कर्मचाऱ्याला जाब विचारून मारहाण थांबवली. नागरिकांचा पवित्रा पाहून पोलिसांनी तेथून काढता पाय घेतला, मात्र त्या मनोरुग्णाला कोणतीही सहानुभूती न दाखवता तेथेच सोडण्यात आले. याबाबतचे व्हीडीओ व्हायरल झाले असून यानंतर बजरंग दलाचे तालुका उपाध्यक्ष महेश कोरवी यांनी याबाबतची रितसर तक्रार जिल्हा पोलीस प्रमुख व जिल्हा अधिकारी यांच्याकडे केली. त्यानंतर मात्र सूत्रे हलवून रात्रीतून त्या मनोरुग्णाला गुपचूपपणे इतरत्र हलविण्यात आले आहे. मात्र गेले दोन दिवस तो मनोरुग्ण गायब असून त्याचा थांगपत्ता लागत नसल्याने परिसरात उलट-सुलट चर्चा सुरू असून संबंधित पोलिसांचा नागरिकांतून निषेध व्यक्त होत आहे.