इचलकरंजी / प्रतिनिधी
हातात बंदुक घेऊन इन्ट्राग्राम स्टोरी आणि व्हॉटसपवर स्टेटस ठेवणार्या दोघा गुन्हेगार प्रवृत्तीच्या युवकांना पोलिसांनी अटक केली आहे. गौरव मरडे, अक्षय पाटील अशी त्या दोघांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून रेकॉर्डवरील गुन्हेगार व गुन्हेगारी प्रवृत्ती युवकांच्यामध्ये हातात तलवारी, बंदुका, आव्हानात्मक मजकुराचा स्टेटस मोबाईलवर व इन्स्ट्राग्रामवर ठेवण्याची क्रेझ सुरू झाली आहे. याची अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपाधिक्षक बाबुराव महामुनी यांनी गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी अशाप्रकारचे इन्स्ट्राग्राम व व्हॉटसपवर स्टेटस ठेवणार्या गुन्हेगार व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांचा शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळण्याची मोहिम सुरू केली आहे.
दोनच दिवसांपूर्वी रेकॉर्डवरील गुन्हेगार आकाश वासुदेव याने खुनाच्या वर्षपूर्तीनिमीत्ताने दुसर्या वादळाची सुरूवात अशा मजकुर व घातक शस्त्रे असलेला स्टेटस मोबाईलवर ठेवल्याचे पोलिसांना आढळून आल्याने त्याच्यासह त्याच्या टोळीला अटक केली आहे. ही घटना ताजी असतानाच येथील गौरव मरडे आणि अक्षय पाटील या दोन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांनी हातात बंदुक घेऊन इन्ट्राग्रामवर स्टोरी आणि व्हॉटसपवर स्टेटस ठेवल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यावरून या दोघांचा शोध घेऊन शुक्रवारी पहाटे अटक केली आहे. याची नोंद शिवाजीनगर पोालीसात झाली आहे.