अशक्य काहीच नसते
गेब ऍडम्स व्हीटली नावाच्या व्यक्तीने स्वतःच्या उत्तम मेकअप आर्टने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. गेबचा जन्म झाला होता, तेव्हा त्याला पाय तसेच हात देखील नव्हते. तरीही त्याला मेकअप ब्रश पकडून स्वतःची जादूई कला दाखवून देण्यापासून कुणीच रोखू शकलेले नाही. सद्यकाळात तो एक अद्भूत मेकअप आर्टिस्ट असून त्याचे काम सोशल मीडियाद्वारे पूर्ण जग पाहत आहे. इन्स्टाग्रामवर तो स्वतःच्या चित्रफिती शेअर करत असतो. हात आणि पाय नसतानाही गेब कशाप्रकारे मेकअप करतो हे तुम्ही पाहू शकता.
22 वर्षीय गेब ऍडम्सचा जन्म ब्राझीलच्या साओ पावलोमध्ये हॅनहार्ट सिंड्रोमसोबत झाला. त्याला बालपणी दत्तक घेण्यासाठी सोडण्यात आले होते. पण अमेरिकेतील एका दांपत्याने त्याला दत्तक घेतले आणि गेबला मुक्त जीवन जगण्याची संधी मिळाली. याचमुळे गेब आज इतरांसाठी एक उदाहरण ठरला आहे. गेब स्वतःची कामे स्वतःच करतो, याकरता कुणाचीच मदत त्याला घ्यावी लागत नाही. तसेचस्वतःचे जीवन पूर्ण आनंदाने जगण्यावर तो विश्वास ठेवतो.
गेब ऍडम्सचे इन्स्टाग्राम पेज असून त्यावर तो स्वतःचे जीवन आणि काम शेअर करत असतो. ‘डोंट वरी, बी हॅप्पी’ असे त्याने स्वतःच्या बायोमध्ये नमूद केले आहे. त्याला या प्लॅटफॉर्मवर 1 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. जीवनात हार मानण्यापेक्षा स्थितीला तोंड देणे अधिक चांगले असे मानणारा गेब सत्यासोबत जगण्याला प्राधान्य देतो.