वृत्तसंस्था / हाथरस
उत्तरप्रदेशच्या हाथरसमध्ये दोन वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि नंतर तिची हत्या करणाऱया गुन्हेगाराला न्यायालयाने गुरुवारी मृत्युदंड ठेठावला आहे. याचबरोबर हाथरस न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी गुन्हेगाराला 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
2019 मध्ये गुन्हेगाराने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यावर तिच्यावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळले होते. उपचारादरम्यान या युवतीचा मृत्यू झाला होता. रुग्णालयात पीडितेने नोंदविलेल्या जबाबाच्या आधारावरच न्यायालयाने गुन्हेगाराला मृत्युदंड ठोठावला आहे. सिकंदराबाद पोलिसांनी 16 एप्रिल 2019 रोजी आरोपीला अटक केली होती.
मोनू याने स्वतःच्या काही अज्ञात सहकाऱयांसोबत मिळून युवतीच्या घरावर हल्ला चढविला होता. तेथे तिच्यावर बलात्कार केला आणि विरोध केल्याने युवतीवर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळले होते. या घटनेदरम्यान युवती घरात एकटीच होती. झालेला प्रकार कळताच घरी पोहोचलेल्या कुटुंबियांनी युवतीला रुग्णालयात दाखल केले होते. तेथेच युवतीने आरोपीचे नाव जबाबात घेतले होते. पण उपचारादरम्यान युवतीचा मृत्यू झाला होता. युवतीच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली होती. पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत हाथरस जिल्हय़ामध्ये न्यायालयाने गुन्हेगाराला मृत्युदंड ठोठावण्याची ही पहिलीच घटना आहे. न्यायालयाने याप्रकरणी जलद सुनावणी करत दोन वर्षांच्या आत गुन्हेगाराला कठोरातील कठोर शिक्षा सुनावली आहे.