ऑनलाईन टीम / मुंबई :
हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनला भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने ‘कोवॅक्सिन’ लस बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. आपल्या विनंतीचा स्वीकार करून, केंद्र शासनाने ही परवानगी दिल्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरु होऊ शकते, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी आज मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, यासंदर्भात वैज्ञानिक तज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार ही मान्यता देण्यात आली आहे. लस बनविण्यासाठी हापकिनला एक वर्षाचा कालावधी मिळाला असून, या प्रकल्पावर नियमित देखरेख व एक वर्षात निर्धारित उत्पादन पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.
मुंबईत होणार उत्पादन
हाफकिन भारत बायोटेकच्या मदतीने मुंबईत कोविड लसीचे उत्पादन करणार आहे. त्यासाठी 154 कोटी रुपये खर्चाचा नवीन उत्पादन प्रकल्प मुंबईत सुरू करण्यात येणार आहे. हाफकिनकडे एप्रिल 2021 ते मार्च 2022 पर्यंत अंदाजे 12 कोटी 60 लाख लसीचे डोस निर्माण करण्याची क्षमता आहे.