वृत्तसंस्था /ब्लोमफौंटेन
झुबेर हामझाचे नाबाद शतक (125) व सरेल एर्वीचे अर्धशतक (97) यांच्या दमदार फलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिका अ संघाने दुसरा डाव 3 बाद 311 धावांवर घोषित करून भारत अ संघाला 304 धावांचे आव्हान दिले. तिसऱया अनधिकृत कसोटीच्या चौथ्या व अखेरच्या दिवशी शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारत अ संघाने दुसऱया डावात 14 षटकांत 2 बाद 75 धावा जमविल्या होत्या.
या सामन्यात द.आफ्रिका अ संघाने पहिल्या डावात 268 धावा जमविल्यानंतर भारत अ ने 276 धावा जमवित यजमान संघावर 8 धावांची नाममात्र आघाडी मिळविली. त्यानंतर द.आफ्रिका अ संघाने दुसऱया डावात तिसऱया दिवशीअखेर 1 बाद 196 अशी भक्कम धावसंख्या उभारली होती. या धावसंख्येवरून शेवटच्या दिवसाच्या खेळाला पुढे सुरुवात केली आणि एर्वी व हामझा यांनी दुसऱया गडय़ासाठी 178 धावांची भागीदारी केली. एर्वी शतकासमीप आला असताना के. गौतमने त्याला त्रिफळाचीत केल्याने त्याचे शतक हुकले. त्याने 10 चौकार, 1 षटकाराच्या मदतीने 97 धावा केल्या. शतक पूर्ण करणाऱया हामझाने नंतर टोनी झॉर्झीच्या साथीने 66 धावांची भर घातली. टोनीला गौतमनेच इशान किशनकरवी झेलबाद केले. त्याने 33 धावा केल्या. संघाचे त्रिशतक फलकावर लागल्यानंतर कर्णधार मलानने द.आफ्रिका अ संघाचा दुसरा डाव 3 बाद 311 धावांवर घोषित केला. हामझा 192 चेंडूत 15 चौकारांसह 125 धावांवर नाबाद राहिला तर झोन्डोने नाबाद 17 धावा केल्या. भारत अ तर्फे के. गौतमने 2, सैनीने एक बळी मिळविला.
भारत अ ने दुसऱया डावात बऱयापैकी सुरुवात केली. पण 31 धावसंख्येवर अभिमन्यू ईश़्वरनला वैयक्तिक 19 धावांवर सिपम्लाने त्रिफळाचीत केले. 14 व्या षटकात मुथुसामीने पृथ्वी शॉला बाद करून भारतीय संघाला दुसरा धक्का दिला. पहिल्या डावात 5 धावा काढणाऱया शॉने यावेळी 8 चौकारांसह 33 चेंडूत 38 धावा फटकावल्या. 14 व्या षटकाअखेर पडिक्कल 14 व कर्णधार हनुमा विहारी शून्यावर खेळत होते.
संक्षिप्त धावफलक
द.आफ्रिका अ पहिला डाव 268, भारत अ पहिला डाव 276, द.आफ्रिका अ दुसरा डाव 86 षटकांत 3 बाद 331 डाव घोषित (झुबेर हामझा नाबाद 125, एर्वी 97, मलान 27, झोन्डो नाबाद 17, टोनी झॉर्झी 33, गौतम 2-81, सैनी 1-49), भारत दुसरा डाव 14 षटकापर्यंत 2 बाद 75 (शॉ 38, ईश्वरन 19, पडिक्कल खेळत आहे 14, विहारी खेळत आहे 0, सिपम्ला 1-30, मुथुसामी 1-4).