दर दोन दिवसांनी ठिकाणात बदल, ग्राहकांसाठी खास कारची सोय
प्रतिनिधी / बेळगाव
मसाज सेंटरवरील कारवाईनंतर बेळगाव शहर व उपनगरांमध्ये हायटेक वेश्या व्यवसायाची पाळेमुळे पोलिसांनी खणून काढली आहेत. शनिवारी मध्यरात्री सदाशिवनगर येथील एका घरावर छापा टाकून दोन तरुणींची सुटका करण्यात आली असून दलाली करणाऱया दोघा जणांना अटक करण्यात आली आहे.
एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱयांनी सदाशिवनगर शेवटच्या बसथांब्याजवळ ही कारवाई केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशमधील एका तरुणीचाही समावेश आहे. एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला असून वेगवेगळय़ा ठिकाणी भाडोत्री घरे घेऊन त्या घरांमध्ये शरीरविक्रयाचा धंदा करण्यात येत असल्याची माहिती उघडकीस आली आहे.
पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. मारुती बाळाप्पा केळगेरी (वय 30), रा. वन्नूर, ता. बैलहोंगल, सिद्धाप्पा पुंडलिक चौगला (वय 33) रा. हुल्लोळ्ळी, ता. हुक्केरी अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. त्यांच्यावर आयटीपीए ऍक्ट 3, 4, 5 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मारुती हा केवळ बेळगाव जिल्हय़ातूनच नव्हे तर मुंबई, बेंगळूर, उत्तर प्रदेशमधून तरुणींना बेळगावात बोलावून त्यांना वाममार्गाला लावत होता. पोलिसांनी अचानक छापा टाकून मारुती व त्याचा कारचालक सिद्धाप्पा यांना अटक केली आहे.
पोलिसांनी केए 22, एन 5568 क्रमांकाची एक कार जप्त केली आहे. आजूबाजूच्या नागरिकांना संशय येऊ नये म्हणून गिऱहाईकांची वाहने इतरत्र उभी करून याच कारमधून गिऱहाईक बोलावून आणण्यात येत होते. यासाठीच मारुतीने सिद्धाप्पाला कारचालक म्हणून ठेवले होते. मारुतीच्या यादीत अनेक धनिकांची नावे व मोबाईल क्रमांक आढळून आले असून ते त्याचे नियमित ग्राहक आहेत. पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी पुढील तपास करत आहेत.