हायवे कामांच्या पाहणीनंतर खासदार विनायक राऊत यांची माहिती
कणकवली:
महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून नांदगाव, तळेरे, कासार्डे, कणकवली या ठिकाणच्या पुलांची कामे बाकी आहेत. ही कामे येत्या काळात मार्गी लागतील. दोन महिन्यांत चौपदरीकरणाचे काम लोकार्पणासाठी सज्ज होईल, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.
राऊत यांनी खारेपाटण ते झाराप अशी चौपदरीकरण कामाची पाहणी केली. यावेळी कार्यकारी अभियंता सलीम शेख, उपअभियंता अमोल ओटवणेकर, ठेकेदार कंपनीचे व्यवस्थापक के. के. गौतम, केसीसी कंपनीचे व्यवस्थापक मनोज पांडे, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, डॉ. प्रथमेश सावंत, नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, सचिन सावंत, राजू राठोड, सुजीत जाधव, ऍड. हर्षद गावडे, प्रसाद अंधारी, विभागप्रमुख अनुप वारंग, विलास कोरगावकर, महेश कोदे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राऊत यांनी अधिकाऱयांना काही सूचना केल्या. त्यानंतर येथील विजयभवन येथे पत्रकारांशी संवादही साधला.
कणकवली शहरातील फ्लायओव्हरचे काम तातडीने करा. कणकवलीत ‘मिसिंग प्लॉट’ आहेत, त्यांची तातडीने भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करत येथे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य नियोजन करा, अशा सूचना राऊत यांनी अधिकाऱयांना केल्या. कणकवलीतील अंतर्गत रस्ते जोडणाऱया नरडवे चौक, तहसील कार्यालयासमोर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक, डीपी रोड, आप्पासाहेब पटवर्धन चौक, भालचंद्र महाराज आश्रम रोड, स्टेट बँकेजवळ फ्लायओव्हर ब्रिजखालील दुभाजकामध्ये पुरेसा ‘मिडलकट’ ठेवावा, अशी मागणी शैलेश भोगले, सुशांत नाईक यांनी केली. नाईक यांनी फ्लाय ओव्हरब्रिजखाली वाहने पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तर कन्हैया पारकर यांनी रस्त्यालगत बसणाऱया भाजी विक्रेत्यांसाठी जागा देऊन त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली. त्यावर राऊत यांनी, जरी फ्लाय ओव्हरब्रिजवरून वाहतूक सुरू झाली, तरी कणकवली शहरातील खालील सर्व्हिस रोडवर समस्या राहता कामा नयेत, त्यादृष्टीने काम करण्याच्या सूचना केल्या.
इंडियन ऑईलमार्फत शौचालयांसाठी सीएसआर फंड उपलब्ध करून देण्यात येईल. त्याकरिता उच्च न्यायालयाचे आदेश तपासून पाहून फ्लाय ओव्हरब्रिजखाली शौचालय व पार्किंगबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना राऊत यांनी दिल्या. स्टेट बँकेसमोरील जागेत रेलिंग करू नका. हॉटेल मंजुनाथ, स्टेट बँक येथे पार्किंगसाठी जागा खुली ठेवा, अशी सूचना राऊत यांनी केली. कणकवली शहरातील दूरवस्था झालेल्या महामार्गालगतच्या गटारांचा प्रश्नही तातडीने सोडविण्याच्या सूचना राऊत यांनी अधिकाऱयांना दिल्या.
नंतर येथील विजयभवन येथे पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, कणकवलीतील फ्लाय ओव्हरब्रिजच्या अंतर्गत असणाऱया व यापूर्वी कोसळलेल्या बॉक्सेल ब्रिजबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. निर्णयाची प्रतीक्षा आहे. कणकवली शहरात फ्लाय ओव्हरब्रिज खाली शौचालय बांधण्याबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत. नगरपंचायतीने जागा उपलब्ध करून दिल्यास इंडियन ऑईलच्या सीएसआर फंडातून शौचालय उभारणी करण्यात येईल.