हेस्कॉमच्या गलथान कारभाराचा फटका
बेळगाव / प्रतिनिधी
अचानक आलेल्या हाय व्होल्टेजमुळे समर्थनगर, पाचवा क्रॉस येथे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. वारंवार हेस्कॉम कर्मचाऱयांना कळवूनही त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला. यामध्ये तब्बल 84 घरांमधील इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे निकामी झाल्याने नागरिकांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. त्यामुळे हेस्कॉमने याचा पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
शनिवारी दुपारी अचानक विद्युत वाहिन्यांमधून उच्चदाबाने वीजपुरवठा झाला. त्यामुळे तात्काळ परिसरातील विद्युत उपकरणे निकामी झाली. अचानक आवाज येऊन उपकरणांमधून धूर येऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. महागडे टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, फॅन, सेट बॉक्स, होमथिएटर यासह इतर साहित्य निकामी झाल्याने अंदाजे 20 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती रहिवाशांनी दिली.
याची माहिती हेस्कॉम अधिकाऱयांना देण्यात आली. परंतु त्यांनी कर्मचारी पाठवून देतो असे सांगून हात वर केले. यापूर्वी ट्रान्स्फॉर्मरमध्ये बिघाड असल्याने दुरुस्ती करण्यात यावी, अशी विनंती केली होती. परंतु हेस्कॉम कर्मचारी तसेच अधिकाऱयांनी दुर्लक्ष केल्यामुळेच हा लाखो रुपयांचा फटका बसल्याचे रहिवाशांचे मत आहे. काहीवेळाने हेस्कॉम कर्मचाऱयांनी येऊन दुरुस्ती केली. परंतु पुन्हा सायंकाळी असाच प्रकार घडून पुन्हा काही उपकरणे निकामी झाल्याचे नागरिकांनी सांगितले.
अधिकाऱयांची थातूरमातूर उत्तरे
ही वसाहत अनधिकृत असल्याने असे प्रकार घडत असल्याचा जावईशोध हेस्कॉमच्या अधिकाऱयाने काढला. एकाच ट्रान्स्फॉर्मरवर भार वाढल्याने हाय व्होल्टेजचे प्रकार होत असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु कनेक्शन देताना दंड भरूनही कनेक्शन दिले जात नसल्याने दुसरा ट्रान्स्फॉर्मर बसविणे ही तुमची जबाबदारी आहे, असे ठणकावल्यानंतर तो अधिकारी नरमला. परंतु आता नुकसानभरपाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. नुकसानभरपाई न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा हेस्कॉमला दिला आहे.
कोरोनामुळे व्यवसाय थंडावले असतानाच नुकसान
निलेश कणेरी (रहिवासी)
शनिवारी दुपारी अचानक हायव्होल्टेजमुळे मोठे नुकसान झाले आहे. फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन यासह इतर साहित्य निकामी झाले. आधीच कोरोनामुळे व्यवसाय थंडावले असतानाच नुकसान झाले आहे. त्यामुळे आम्हाला नुकसानभरपाई मिळावी, असे त्यांनी सांगितले.