आयपीएल साखळी फेरी : सर्वस्व पणाला लावले तरच पंजाबचा निभाव, राहुलसेनेसमोर दुबळय़ा फलंदाजीची मुख्य चिंता
अहमदाबाद / वृत्तसंस्था
यंदाच्या आयपीएल मोसमात पूर्ण बहरात असलेल्या हाय-फ्लाईंग रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरला सामोरे जाताना पंजाब किंग्सला आज (शुक्रवार दि. 30) सर्वस्व पणाला लावावे लागेल, असे प्रथमदर्शनी संकेत आहेत. पंजाबचा संघ सध्या झगडत असून मागील लढतीत त्यांचा केकेआरविरुद्ध 5 गडय़ांनी फडशा पडला होता. आज बहरातील आरसीबीविरुद्ध त्यांची आणखी कसोटी लागू शकेल. ही लढत सायंकाळी 7.30 पासून खेळवली जाणार आहे.
पंजाबचा संघ सध्या 4 पराभव व 2 विजय अशा कामगिरीसह गुणतालिकेत 6 व्या स्थानी असून दुसरीकडे, आरसीबीचा संघ 5 विजयांसह दुसऱया स्थानी आहे. आरसीबी व चेन्नईचे समसमान 10 गुण असून चेन्नई सरस धावगतीच्या निकषावर अव्वलस्थानी विराजमान आहे.
चेन्नईविरुद्धचा एकमेव पराभव वगळता, आरसीबीने अव्वल प्रदर्शन साकारले असून याचमुळे ते यंदा पहिल्यावहिल्या आयपीएल जेतेपदासाठी दावेदारांमध्ये गणले जात आहेत. दुसरीकडे, पंजाबला सातत्याचा अभाव असलेल्या फलंदाजीची मुख्य चिंता आहे. या संघाने प्रथम फलंदाजी करताना 106, 120 व 123 अशा निचांकी धावा केल्या असून कर्णधार राहुलने मागील 6 लढतीत अनुक्रमे 91, 5, 61, 4, नाबाद 60 व 19 धावांचे योगदान दिले आहे. मयांकने बऱयाचदा मोठी खेळी उभारण्याची संधी आपल्या चुकीने गमावली आहे तर ख्रिस गेलला 6 पैकी केवळ दोनच वेळा चांगली खेळी साकारता आली आहे.
निकोलस पूरनला या हंगामात अद्याप सूर सापडलेला नाही. पूरनला 5 डावात केवळ 28 धावा जमवता आल्या असून यातही तो चक्क 3 वेळा शून्यावर बाद झाला आहे. केकेआरविरुद्ध 19 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. आजच्या लढतीत त्याच्याऐवजी जागतिक स्तरावरील सर्वोत्तम टी-20 फलंदाजांपैकी एक असलेल्या इंग्लिशमन डेव्हिड मलानला संधी मिळणे शक्य आहे.
दिल्लीविरुद्ध विजयाने आरसीबी आणखी निश्ंिचत यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रोमांचक लढतीत अवघ्या एका धावेने निसटता विजय संपादन केल्यानंतर आरसीबी संघाचे मनोबल अर्थातच आणखी उंचावलेले आहे. दिल्लीविरुद्ध एबी डीव्हिलियर्सने आणखी एक धमाकेदार खेळी साकारली तर गोलंदाजांनीही उत्तम मारा साकारला होता. आरसीबीची फलंदाजी विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, डीव्हिलियर्स, ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल यांच्यावर अवलंबून रहात आली असून रजत पाटीदारने आपली उपयुक्तता दाखवून दिली आहे. काईल जेमिसनने देखील फटकेबाजीत हात आजमावून पाहिले आहेत. सध्याचा पर्पल कॅप होल्डर हर्षल पटेलमुळे या संघाची गोलंदाजी देखील भक्कम आहे. मोहम्मद सिराजने तर दिल्लीविरुद्ध रिषभ पंत व शिमरॉन हेतमेयरसारखे सेट झालेले फलंदाज क्रीझवर असताना शेवटच्या षटकात 14 धावांचे यशस्वीरित्या संरक्षण करुन संघाला विजय मिळवून दिला होता.
प्रतिस्पर्धी संघ
पंजाब किंग्स : केएल राहुल (कर्णधार व यष्टीरक्षक), मयांक अगरवाल, ख्रिस गेल, मनदीप सिंग, प्रबसिमरन सिंग, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), सर्फराज खान, दीपक हुडा, मुरुगन अश्विन, रवी बिश्नोई, हरप्रीत ब्रार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, इशान पोरेल, दर्शन नळकांडे, ख्रिस जॉर्डन, डेव्हिड मलान, झाय रिचर्डसन, शाहरुख खान, रिले मेरेडिथ, मोईसेस हेन्रिक्यूज, जलज सक्सेना, उत्कर्ष सिंग, फॅबियन ऍलन, सौरभ कुमार.
आरसीबी : विराट कोहली (कर्णधार), एबी डीव्हिलियर्स (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, पवन देशपांडे, शाहबाज अहमद, एमएस वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, डॅनिएल सॅम्स, हर्षल पटेल, ग्लेन मॅक्सवेल, सचिन बेबी, रजत पाटीदार, मोहम्मद अझरुद्दीन, काईल जेमिसन, डॅन ख्रिस्तियन, सुयश प्रभुदेसाई, केएस भरत, फिन ऍलन.
सामन्याची वेळ : सायं. 7.30 पासून.