आयपीएल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर गुजरातचे शिबिर अहमदाबादमध्ये शक्य
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अष्टपैलू हार्दिक पंडय़ाने आगामी आयपीएल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सरावाला सुरुवात केली. या हंगामात तो गुजरात टायटन्सचे नेतृत्व सांभाळणार आहे. सध्या तो अभिनव मनोहर, दर्शन नळकांडे, वरुण ऍरॉन यांच्यासह सराव सत्रात सहभागी आहे. सदर सराव सत्र दि. 25 फेब्रुवारीला सुरु झाले असून दि. 2 मार्च रोजी त्याची सांगता होईल. पूर्ण संघासाठी प्रशिक्षण शिबिराचे अहमदाबादमध्ये आयोजन केले जाण्याची शक्यता आहे.
गुजरात टायटन्स संघाने आगामी हंगामासाठी युवा, ठासून उर्जा भरलेल्या खेळाडूंचा संघ बांधला असून मोहम्मद शमी, जेसॉन रॉय, लॉकी फर्ग्युसन यांच्यासारखे अव्वल खेळाडू करारबद्ध केले. या संघात राहुल तेवातिया, विजय शंकर, डेव्हिड मिलर, वृद्धिमान साहा यांचाही समावेश आहे. हार्दिक पंडय़ा, रशिद खान व शुभमन गिल हे या संघाचे प्रथम पसंतीचे खेळाडू आहेत.
यंदाची आयपीएल स्पर्धा दि. 26 मार्च ते 29 मे या कालावधीत खेळवली जणार असून प्राथमिक टप्प्यात 70 सामने होणार आहेत. मुंबई व पुण्यातील चार आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सर्व सामने होतील. त्यानंतर प्ले-ऑफचे बाद फेरीतील उर्वरित 4 सामन्यांबाबत कालांतराने निर्णय घेतला जाणार आहे.
मुंबईतील वानखेडे व डीवाय पाटील स्टेडियमवर प्रत्येकी 20 तर ब्रेबॉर्न स्टेडियम व पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर प्रत्येकी 15 सामने होणार आहेत. स्पर्धेसाठी 2 गट विभागले गेले असून अ गटात मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, केकेआर, राजस्थान, लखनौ सुपरजायंट्स तर ब गटात चेन्नई सुपरकिंग्स, सनरायजर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर, पंजाब किंग्स व गुजरात टायटन्स या संघांचा समावेश आहे.
गुजरात टायटन्स संघ ः हार्दिक पंडय़ा (कर्णधार), शुभमन गिल, रशिद खान, मोहम्मद शमी, जेसॉन रॉय, लॉकी फर्ग्युसन, अभिनव सदरंगिनी, राहुल तेवातिया, नूर अहमद, आर. साई किशोर, डॉमिनिक ड्रेक्स, जयंत यादव, विजय शंकर, दर्शन नळकांडे, यश दयाल, अल्झारी जोसेफ, प्रदीप संगवान, डेव्हिड मिलर, वृद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, गुरकिरत सिंग, वरुण ऍरॉन, बी. साई सुदर्शन.