अवघ्या दोन दशकांपूर्वी योगासने हा आधुनिक पद्धतीने व्यायाम करणाऱया लोकांसाठी चेष्टेचा विषय होता. शीर्षासन हा योगासनांचाच एक प्रकार आहे. शीर्षासन करणाऱया व्यक्तींचीही खिल्ली उडविली जात असे. तथापि आता योगविद्येवर मोठे संशोधन झाले असून दीर्घकाळ टिकणारे आणि आधुनिक औषधोपचारांना दाद न देणारे विकार योगासनांमुळे नियंत्रणात आणता येतात किंवा बरेही होऊ शकतात असे निर्विवादपणे दिसून आले आहे.
शरीराच्या आतील कार्य व्यवस्थित चालण्याकरिता हार्मोन्सचा शरीरातील समतोल योग्य राखणे आवश्यक असते. हा समतोल राखण्याचे काम शरीर स्वतःच करते. तथापि कांही कारणांमुळे शरीराची हार्मोन संतुलनाची व्यवस्था डळमळीत झाल्यास शरीराची मोठी हानी होऊ शकते. अशावेळी औषधोपचारांच्या सहाय्याने हार्मोन संतुलन पुन्हा मिळवावे लागते. ही औषधे अत्यंत महागडी असून कायम घ्यावी लागतात. मात्र शीर्षासन नियमितपणे केल्यास हार्मोन संतुलन योग्यप्रकारे टिकून राहते, असे दिसून आले आहे. शीर्षासनामुळे चित्त एकाग्र करण्याची क्षमता प्राप्त होते. याचा विद्यार्थ्यांना अभ्यास करताना उपयोग होतो. तसेच शीर्षासनामुळे पाठीचा कणा सरळ आणि समतोल अवस्थेत राहतो.
यामुळे शरीराच्या अंतर्गत निर्माण होणाऱया हार्मोन्सवर नियंत्रण ठेवणे मज्जासंस्थेला सुलभ होते असे संशोधनातून दिसून आले आहे. हे संशोधन युरोप आणि अमेरिकेत झाले असून त्याचे परिणाम सकारात्मक आले आहे. प्रतिदिन 5 ते 10 मिनिटे शीर्षासन केल्यास श्वसन प्रक्रिया, रक्ताभिसरण आणि मेंदूकडचा रक्तपुरवठा चांगल्याप्रकारे होतो. रक्तातीत ऑक्सिजनही शरीरात सर्वदूर पसरवितो. परिणामी हार्मोन संतुलन योग्यप्रकारे होते असे आढळून आले आहे.