आज मुख्य दिवस : मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत निघणार संदल मिरवणूक
वार्ताहर/ किणये
हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक मानल्या जाणाऱया हालगा येथील मोहरमला साधेपणाने सुरुवात झाली आहे. शनिवार दि. 29 रोजी या मोहरम उत्सवाचा मुख्य दिवस आहे. दरवर्षी मोठय़ा उत्साहात व जल्लोषात गावात संदल मिरवणूक काढण्यात येते. यंदा कोरोनामुळे शनिवारी सकाळी 6 च्या दरम्यान व सायंकाळी 6.30 च्या वेळेत केवळ दर्गा परिसरातच संदल मिरवणूक अगदी मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत काढण्यात येणार आहे.
गेल्या कित्येक वर्षापासून गावातील हिंदू-मुस्लीमबांधव एकत्रितपणे हा मोहरम साजरा करण्याची परंपरा आहे. गेल्या आठ दिवसापासून या मोहरमला सुरुवात करण्यात आली असून शनिवारी महत्त्वाचा दिवस असल्याने विविध धार्मिक विधी सध्यापद्धतीने करण्यात येणार आहेत.
या मोहरमची रविवारी सांगता होणार आहे. शनिवारी दर्गा परिसरात येताना मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. तसेच सामाजिक अंतर व सॅनिटायझरचा वापरही करण्यात येणार आहे. तसेच भाविकांनी गर्दी करून दर्ग्यामध्ये येऊ नये, असेही ठरविण्यात आले आहे.