महाबळेश्वर / प्रतिनिधी :
महाबळेश्वर कोरोनामुक्त करण्यासाठी पालिकेने कंबर कसली असुन, विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना पालिकेच्या वतीने राबविल्या जात आहेत. यामध्ये हाॅटस्पाॅट ठरलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये आता खास शिबीराचे आयोजन करून तेथील रहिवाशांची एकाच वेळी कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याची माहीती पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली.
कोरोनाने जिल्ह्यात थैमान घातले आहे. जिल्हात सर्वत्र कोरोनाचे रूग्ण मोठया प्रमाणावर आढळत आहेत. अनेक प्रयत्न करूनही कोरोना बाधितांचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही. हे प्रमाण कमी व्हावे यासाठी पालिकेच्या वतीने विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविल्या जात आहेत. कोरोनाचे रूग्ण शोधण्यासाठी पालिकेच्या वतीने आठ प्रभागात आठ विशेष पथके नागरीकांची आरोग्य तपासणी करीत आहेत. लक्षणे नाहीत परंतु कोरोना बाधित आहे, अशा रूग्णांना विलगीकरण कक्षात सोय करण्यात आली आहे.
शहरातुन रोज फवारणी करून शहर निर्जंतुक करण्यात येत आहे. डासांसाठीही धुर फवारणी करण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. वेळ प्रसंगी दुकानांना सील ठोकले जात आहे.
नाक्या नाक्यावर बाहेरून येणारांची कोटकोरपणे तपासणी करण्यात येत आहे. ई पास असणारांनाच शहरात प्रवेश दिला जात आहे. माॅर्निंग तथा ईव्हिनिंग वाॅकवर बंदी असुन यावर देखरेख करण्यासाठी खास पथकाची नेमणुक करण्यात आली आहे. मास्क व सॅनिटाईजरचा वापर सक्तीचा करण्यात आला आहे. पालिका कार्यालयात अभ्यांगतांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. आता या बरोबरच हाॅटस्पाॅट ठरेलल्या विविध गृहनिर्माण सोसायटयांमध्ये खास कोरोना शिबीराचे आयोजन करून तेथील सर्व नागरीकांची एकाच वेळी कोरोना तपासणी तपासणी करण्यात येणार आहे.
मास टेस्टिंग योजनेचा शुभारंभ मंगळवारी पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील करावीआळा येथे करण्यात आला. या आळी मधील 50 व्यक्तींच्या ॲन्टीजेन टेस्ट करण्यात आल्या. या मध्ये तीन महीला व तीन पुरूष असे एकुन सहा व्यक्तींचे अहवाल कोरोना बाधित आले. या सर्व कोरोना बाधितांना तातडीने होम आयसोलेशन मध्ये पाठविण्यात आले व तातडीने त्यांचेवर उपचार सुरू करण्यात आले. मास टेस्टिंगमुळे हाॅटस्पाॅट विभागातील सहा कोरोना रूग्ण शोधण्यात पालिकेला यश आले जर ही तपासणी करण्यात आली नसती तर हे सहा कोरोना बाधितांनी इतरांना कोरोनाचा प्रसाद दिला असता व रूग्ण संख्या वाढली असती पंरतु सुदैवाने असे काही घडण्या पुर्वीच रूग्ण शोधण्यात पालिकेला यश आले.
कारवी आळा नंतर गणेश नगर हौ सोसायटी, दत्त नगर हौ. सोसायटी, अंबिका व नामदेव हौ. सोयायटी, मुन्वर हौ सोसायटी, जन्नीमाता हौ. सोसायटी जिजामाता हौ. सोसायटी अशा ठिकाणी एकाच वेळी तेथील रहीवाशांची कोरोना तपासणी करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.