छायाचित्राने आनंद महिंद्रांचे मन जिंकले
एका सुंदर छायाचित्राने देशातील दिग्गज उद्योजक आनंद महिंद्रा समवेत अनेकांचे मन जिंकले आहे. हे छायाचित्र मुंबईतील एका रेल्वेस्थानकाचे आहे. तेथे लोकल पकडण्यासाठी पोहोचलेल्या एका प्रवाशाने रेल्वेत चढण्यापूर्वी खाली वाकून त्याला नमन केले आहे. एका व्यक्तीने हा क्षण कॅमेऱयात कैद केला आहे. हे छायाचित्र इंटरनेटवर मोठय़ा प्रमाणावर प्रसारित होत आहे. हे छायाचित्र मुंबईची लोकल ट्रेन शहराची लाइफलाइन असल्याचे का म्हटले जाते हे दर्शवून देत.
कोरोना संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारने मुंबईतील उपनगरीय रेल्वेसेवा सर्वसामान्यांसाठी बंद केली होती. पण 1 फेब्रुवारी रोजी 11 महिन्यांनी या उपनगरीय रेल्वे सर्वसामान्यांसाठी खुल्या झाल्या आहेत.
हे छायाचित्र उद्योजक आनंद महिंद्रा यांनीही प्रसारित केले आहे. ‘भारताचा आत्मा… हा कधीच आम्ही गमावू नये अशी प्रार्थना करतो’ असे त्यांनी नमूद केले आहे. त्यांच्या या ट्विटला आतापर्यंत 5 हजारांपेक्षा अधिक लाइक्स प्राप्त झाले आहेत.