अमेरिकेचे अध्यक्ष बिडेन यांचे पुतीन संबंधी वक्तव्य – क्रेमलिनकडून आले प्रत्युत्तर
‘हा व्यक्ती सत्तेवर राहू शकत नाही…’ असे ब्लादिमीर पुतीन यांच्यासंबंधी जो बिडेन यांनी केलेले वक्तव्य अमेरिकेच्या मुत्सद्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरले आहे. बिडेन यांच्या या वक्तव्यामुळे तणाव आणखीन वाढू शकतो असे अमेरिकेच्या विदेश धोरणातील तज्ञांचे मानणे आहे. बिडेन यांनी शनिवारी पोलंडच्या वॉर्सामध्ये पुतीन यांच्यासंबंधी बोलताना ‘हा व्यक्ती सत्तेवर राहू शकत नाही’ असे म्हटले आहे. हे बिडेन यांनी केलेले हे विधान उत्स्फूर्त होते, ज्यानंतर त्वरित व्हाइट हाउसचे अधिकारी डॅमेल कंट्रोल करण्यात गुंतले. पुतीन रशियात सत्तेवर राहण्यासंबंधी बिडेन बोलत नव्हते. पुतीन यांना स्वतःच्या शेजाऱयांवर किंवा क्षेत्रावर बळाचा वापर करू दिला जाऊ शकत नाही असा बिडेन यांच्या विधानाचा अर्थ होता असा दावा एका अधिकाऱयाने केला आहे. बिडेन यांची ही टिप्पणी अमेरिका आणि रशियातील संबंध आणखीन बिघडवू शकते असे अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांचे मानणे आहे.
अमेरिकेचे विदेशमंत्री एंटनी ब्लिंकेने यांनी त्वरित रशियाच्या विदेश मंत्र्यांशी संपर्क साधून बिडेन यांची टिप्पणी म्हणजे अमेरिकेचे विदेश धोरण नसल्याचे स्पष्ट करावे असे कौन्सिल ऑन फॉरेशन रिलेशन्सचे अध्यक्ष रिचर्ड हास यांनी म्हटले आहे. बिडेन यांनी यापूर्वी पुतीन यांना ‘कसाई’ संबोधिले होते. परंतु व्हाइट हाउसने या विधानापासूनही अंतर राखले होते.
बिडेन यांची ही टिप्पणी ‘ऑफ-स्क्रिप्ट’ होती. बिडेन यांची ही टिप्पणी पुतीन यांना अधिकच भडकवून युक्रेनमधील हल्ला तीव्र होऊ शकतो असे काही तज्ञांचे मत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष एअरफोर्स वनमध्ये स्वार होण्यापूर्वी त्यांचे सहकारी देश बिडेन मॉस्कोमध्ये सरकार बदलण्याचे आवाहन करत नव्हते असा दावा करू लागले होते.
रशियाकडून प्रत्युत्तर
क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यानी बिडेन यांचे विधान फेटाळून लावले आहे. रशियाच्या सत्तेवर कोण राहणार हे अमेरिका किंवा त्याचे अध्यक्ष ठरवू शकत नाहीत असे पेस्कोव्ह यांनी म्हटले आहे. तर बिडेन प्रशासनाने भूमिकेत कुठलाच बदल झालेला नसून अमेरिका या संघर्षात हस्तक्षेप करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
पुतीन यांना इशारा
वॉर्साच्या प्रतिष्ठित रॉयल कॅसलमध्ये पोहोचण्यापूर्वी बिडेन यांनी पाश्चिमात्य सहकाऱयांना ‘स्वातंत्र्याच्या नव्या लढाई’त एका अवघड मार्गावर चालण्यासाठी तयार राहण्यास सांगितले आहे. नाटोच्या सीमेत एक इंच देखील शिरण्याचा विचार करू नका असे बिडेन यांनी पुतीन यांना बजावले आहे. ब्लादिमीर पुतीन हे नाटोला विभाजित करू पाहत आहेत, परंतु आम्ही एकजूट असल्याने पुतीन यात यशस्वी होणार नाहीत असे बिडेन यांनी पोलंडचे अध्यक्ष आंद्रेजेज डूडा यांच्यासोबतच्या बैठकीदरम्यान म्हटले आहे.