वार्ताहर / कुंभोज
हिंगणगाव तालुका हातकणंगले येथे अवैधरित्या दोन ठिकाणी देशी दारू गांजा विकला जातो, त्यामुळे हिंगणगाव व परिसरातील तरुण वर्ग, वयस्कर लोकांच्यात व्यसनाधिनता मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. यावर वेळीच बंधन घालण्यासाठी शासनाकडे दारूबंदीची मागणी करूनही शासनाने अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही.
याबाबत आज हिंगणगाव मधील काही महिलांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत येथे दारूबंदीचे निवेदन दिले. तसेच ग्रामपंचायत उपसरपंच स्वप्नील पाटील, उत्तम माने अभिजीत नळे, अशोक खांबे, गावकामगार पोलीस पाटील व ग्राम विकास अधिकारी मुसळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी गावात अवैधरित्या चालू असलेल्या दारू विक्रीच्या ठिकाणी भेट देऊन या ठिकाणावरची दारू गटारीत ओतली. याबरोबरच दारू विकणार्या महिलांना आक्रमक रित्या दारू न विकण्याचा सल्ला देऊन पुन्हा अशा कोणत्याही प्रकारची देशी अथवा विदेशी दारूची, गांजाची विक्री झाल्यास त्यांची गय केली जाणार नाही, अशी धमकीही महिलांच्यावतीने देण्यात आली.
यावेळी विक्रीसाठी आणलेली देशी दारू महिलांनी गटारीत ओतून आपला निषेध व्यक्त केला, यावेळी हिंगणगाव ग्रामपंचायत यांनी हिंगणगाव येथील दारूबंदीसाठी हिंगणगाव ग्रामपंचायत महिलांच्या पाठीशी असून लवकरच गावसभा घेऊन दारूबंदीचा ठराव करण्यात येईल, तसेच सध्या दारू विक्री करत असलेल्या नागरिकांच्या योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे मत उपसंरपच स्वप्नील पाटील यांनी बोलताना व्यक्त केले. यावेळी महिलांची आक्रमक पवित्रा पाहता दारू विक्रेत्यांनी सदर ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परिणामी सदर महिलांनी घरामध्ये घुसून विक्रीसाठी आलेली दारू रस्त्यावर ती फेकून देऊन सदर घटना निंदनीय असून ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली.
यावेळी रेखा पाटील, आनंदा कोळी, अनिता कोळी राजमती कोळी, वंदना कोळी, कस्तुरी तेरदाळे ,शांताबाई पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ पोलीस पाटील व ग्रामसेवक उपस्थित होते. सदर महिलांच्या निर्णयांचे हिंगणगाव ग्रामस्थांतून स्वागत होत आहे.