हिंगणघाट / प्रतिनिधी
हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाचा आज दोन वर्षानंतर निकाल लागला असून या प्रकरणी आरोपी विकेश नगराळेला दोषी ठरवून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यत आली आहे. प्राध्यापिका फुलराणीच्या मारेकऱ्याला दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता हिंगणघाट न्यायालयात तिच्या मृत्यूच्या दोन वर्षानंतर आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
प्राध्यापिका फुलराणी जळीतकांड प्रकरणाचा 426 पानांचे दोषारोपपत्र दिनांक 28 फेब्रुवारी 2020 रोजी हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन माजगावकर यांच्या न्यायालयात तत्कालीन पोलिस निरीक्षक सत्यविर बंडीवार यांनी सादर केले होते.
फुलराणी जळीतकांड प्रकरण खटल्याच्या युक्तिवादाला 11 जानेवारी 2021 रोजी सुरुवात झाली असता, मृत फुलराणीच्या वडिलांची दिनांक 12 जानेवारी रोजी विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी साक्ष नोंदविली होती. त्यानंतर पोलिसांची साक्ष नोंदवण्यात आली आरोपीने फुलराणीवर पेट्रोल टाकून घटनास्थळावरुन पळ काढत अंगावर असलेले कपडे शेतात लपविले असल्याचे साक्ष नोंदविताना पोलिसांकडून सांगण्यात आले. आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे हा घटनेच्या दिवशी कामावरुन गैरहजर असल्याची साक्ष दिनांक 6 एप्रिल2021 रोजी रेल्वे विभागातील कंत्राटदार दिपकसिंग ठाकूर यांनी दिली होती.