वार्ताहर /हिंडलगा
बेंगळूरमध्ये समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केल्याच्या निषेधार्थ रविवारी हिंडलगा ग्रा. पं. कार्यक्षेत्रात कडकडीत बंद पाळण्यात आला. ग्रामस्थांनी सर्व दुकाने व व्यवहार बंद ठेऊन बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन छत्रपती शिवाजी महाराजांवर असलेली निष्ठा दाखवून दिली. यावेळी गावात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान समस्त देशवासियांचा अपमान आहे. बेंगळूर येथे घडलेल्या निंदनीय घटनेमुळे संपूर्ण राज्यासह महाराष्ट्रातही संतापाची लाट उसळली आहे. त्याच्या निषेधार्थ रविवारी हिंडलग्यात कडकडीत बंद पाळून सहकार्य करण्याचे आवाहन ग्रा. पं. अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांनी केले होते. याला शिवप्रेमी व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत दिवसभर ग्रा. पं. हद्दीतील सर्व दुकाने व व्यवहार बंद ठेवले होते. सुटीचा दिवस असूनही गावामध्ये शुकशुकाट पसरला होता.
रामदेव गल्लीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला ग्रा.पं. सदस्य रामचंद्र मन्नोळकर व ग्रा. पं. अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांच्या हस्ते दुग्धाभिषेक घालून पूजा करण्यात आली. याप्रसंगी रामचंद्र मन्नोळकर, नागेश मन्नोळकर व सदस्य एन. एस. पाटील यांनी बेंगळूरमध्ये घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी ग्रा. पं. सदस्य, विविध संघटनांचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.