हिंडलगासह परिसरातील भाविकांचा रथोत्सव मिरवणुकीत सहभाग
वार्ताहर / हिंडलगा
‘उदो ग आई उदो’ ‘श्री महालक्ष्मी देवीच्या नावान चांगभलं’,च्या अखंड जयघोषात हजारो भाविकांच्या उपस्थितीत मंगळवार दि. 16 रोजी हिंडलगा येथील ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. हिंडलगासह परिसरातील भाविकांनी रथोत्सव मिरवणुकीत सहभाग घेऊन देवीचे दर्शन घेतले. गावात पहिल्यांदाच श्री लक्ष्मी यात्रा पहावयास मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे.
सोमवारी रात्री विधीवत पूजनाने देवीचा हळदी कार्यक्रम पार पडल्यानंतर मंगळवारी सकाळी 6.45 वा. यात्रोत्सव संघाचे पदाधिकारी, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर व हजारो भाविकांच्या उपस्थितीत लक्ष्मी गल्लीतील श्री लक्ष्मी मंदिरासमोर अक्षतारोपण समारंभ पार पडला. त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवून 10 वाजून 10 मिनीटांनी हक्कदार, मानकरी व पंचमंडळींच्या उपस्थितीत गाऱहाणे घालून भंडाऱयाची उधळण करत जल्लोषी वातावरणात रथोत्सव मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. यामध्ये युवकांसह महिलांनी देखील सहभाग घेतला. तसेच रथ ओढण्यास हातभार लावला. रथासमोरील बाजूला धनगरी ढोल पथक व बँड पथक होते.
त्यानंतर सूर्यास्तापूर्वी बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर कारागृहासमोर मिरवणूक थांबविण्यात आली. मिरवणुकीच्या स्वागतासाठी मार्गावर आकर्षक अशा रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या. तर युवकांनी ठिकठिकाणी भगवे ध्वज, पताका व शुभेच्छा फलक लावून भाविकांचे स्वागत केले. बुधवारी सकाळी 8 वाजता पुन्हा रथोत्सव मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. आंबेवाडी क्रॉसमार्गे दुपारी 2 पर्यंत गदगेपर्यंत पोचल्यानंतर मिरवणुकीची सांगता होईल. त्यानंतर देवीची विधीवत पूजा करून ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.
मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक स्वतः फौजफाटय़ासह लक्ष ठेवून होते. तर काकती व एपीएमसी स्थानकाचे पोलिसही बंदोबस्तासाठी कार्यरत होते. शिवाय यात्रोत्सव संघाच्या योग्य नियोजनामुळे पहिल्या दिवशीची मिरवणूक सुरळीत पार पडली. ग्रामपंचायतीने सॅनिटायझरची फवारणी करून परिसर निर्जंतुकीकरण करण्यासाठी योगदान दिले. लक्ष्मी मंदिरापासून रथोत्सवाची सुरुवात करून मरगाई गल्लीमार्गे वाजत गाजत मिरवणूकक बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरून आंबेवाडी क्रॉसपर्यंत नेण्यात आली.
आमदार लक्ष्मी हेब्बाळकरांकडून टँकरची सोय
यात्रा काळात परगावातून येणाऱया भाविकांना व ग्रामस्थांना पाण्याची कमतरता भासू नये यासाठी बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पाच टँकरची सोय केली असून, संपूर्ण गावामध्ये फिरून पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे ग्रामस्थ व भाविकांची उत्तम प्रकारे पाण्याची सोय झाली आहे.