बेळगाव-वेंगुर्ला रोडवर वाहतुकीची कोंडी : पोलिसांच्या नियंत्रणाने नागरिकांची सुटका
वार्ताहर / हिंडलगा
हिंडलगा येथील श्री महालक्ष्मी देवी यात्रेला तिसऱया दिवशी गुरुवारी (दि. 18) सकाळपासूनच भाविकांनी अलोट गर्दी झाली होती. त्यामुळे बेळगाव-वेंगुर्ला महामार्ग व गणेशपूर रोड परिसरात मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. परिणामी बेळगावपासून अवघे दोन ते तीन कि. मी. चे अंतर कापण्यासाठी वाहनधारकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली.
तब्बल 100 वर्षांनंतर पहिल्यांदाच गावामध्ये श्री महालक्ष्मी देवीची भव्य प्रमाणात यात्रा भरविण्यात आली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यात्रा केवळ पाच दिवस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दर्शन घेण्यासाठी वेळ कमी असल्याने गुरुवारी सकाळी 6 वाजल्यापासून बेळगाव शहर आणि परिसरासह महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकातील इतर ठिकाणांहून येणाऱया भाविकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी झाल्याने वाहनधारकांची चांगलीच कोंडी झाली. बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावरील मिलिटरी विनायक मंदिरापासून ते हिंडलगा गावापर्यंत दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यावर रहदारी पोलीस व बेळगाव ग्रामीणच्या पोलीस कर्मचाऱयांनी वेळीच नियंत्रण ठेवल्याने नागरिकांची सुटका झाली. देवीच्या गदगेसमोर ओटी भरण्यासाठी महिला व भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. पण यात्रोत्सव संघाने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सुरक्षित अंतर ठेवून दर्शन घेण्याची सूचना केल्याने भाविकांना ठराविक वेळानंतर दर्शन मिळाले.