प्रतिनिधी /बेळगाव
हिंडलगा येथे कुष्टरुग्णांच्या सेवेसाठी असलेले द लेप्रसी रुग्णालय आता नव्या जोमात रुग्णांच्या शस्त्रक्रियेसाठी सज्ज करण्यात आले आहे. लेप्रा रिऍक्शन व न्युरिटीस, अल्सरसह इतर आजारांवर शस्त्रक्रिया केल्या जात आहेत.
जिल्हा कुष्टरोग विभागाच्यावतीने दि. 11 व 12 मार्च रोजी हे शिबिर पार पडले. रुग्णांची पाहणी करून ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज आहे त्यांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. तत्पूर्वी रुग्णांना प्रि-ऑपरेटिव्ह थेरपी करण्यात आली. लेप्रसी मिशनचे सर्जन डॉ. डी. विजयकुमार व डॉ. प्रेमल दास यांनी 13 शस्त्रक्रिया केल्या.
बेळगाव जिल्हा कुष्टरोग अधिकारी डॉ. चांदनी देवडा यांनी शिबिरादरम्यान रुग्णालयाला भेट दिली. आपले अवयव पूर्ववत होण्यासाठी डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष न करता ते कार्यरतपणे सुरू ठेवणे गरजेचे आहे, असे सांगितले. रुग्णालय सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत रुग्णांच्या सेवेसाठी सुरू असणार आहे.