दोन घरे फोडली, तिसरे घर फोडताना चोरटा नागरिकांच्या हाती
वार्ताहर / हिंडलगा
हिंडलगा येथील नागरिक श्री यल्लाम्मा देवीच्या यात्रेला गेल्याची संधी साधून गुरुवारी रात्री चोरटय़ांनी गावात धुमाकूळ घातला. त्यांनी दोन घरे फोडली, पण तिसरे घर फोडण्याच्या प्रयत्नात एक चोर नागरिकांच्या हाती सापडला. त्यावेळी त्यांनी त्याची चांगलीच धुलाई केली. मात्र त्याचे अन्य साथीदार फरारी होण्यात यशस्वी झाले. या घटनेची नोंद बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात झाली आहे.
याबाबत पोलीस व नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार हिंडलगा येथील सिद्धार्थ कॉलनी येथील रहिवासी विलास लक्ष्मण हित्तलमनी व रुपा एम. कांबळे यांच्या घरी चोरटय़ांनी प्रथम चोरी केली. त्यानंतर विजय गोजगेकर यांच्या घराचा दरवाजा फोडताना शेजाऱयांना जाग आल्याने चोरटय़ांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्लॅबवरून खाली उडी मारून पळताना एक चोरटा जखमी झाल्याने तो नागरिकांच्या हाती सापडला. संतप्त नागरिकांनी त्याची यथेच्छ धुलाई करून चौकशी केली असता चोरीसाठी चौघे जण आलो असल्याचे त्याने कबूल केले. यापैकी एकजण त्याच्या सोबत होता. तर दोघेजण चार चाकी वाहनात बसून होते. सापडलेल्या चोरटय़ाने आपले नाव राजू असे सांगितले. त्याचे खिसे तपासल्यानंतर एका घरातून चोरलेले सोने, चांदीचे दागिने व इतर साहित्य सापडले. तर अन्य एका घरातील संपूर्ण साहित्य चोरून चोरटय़ांनी पोबारा केला आहे. त्यापैकी रवी बाबू हालट्टी (रा. वंटमुरी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर राजू मल्लाप्पा हालट्टी (रा. वंटमुरी) हा पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
विलास हित्तलमनी व इतरांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरटय़ांनी घरातील तिजोरी व कपाट फोडून सात ग्रॅम सोन्याचे दागिने, 70 ग्रॅम चांदीचे दागिने व रोख 10 हजार रुपये असा एकूण 50 ते 60 हजार रुपयांचा ऐवज लांबविला आहे. घटनेची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णवेणी व त्यांच्या सहकाऱयांनी घटनेचा पंचनामा केला. अत्यंत दाट लोकवस्तीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गावातील बहुतांश लोक यल्लाम्मा यात्रेसाठी गेल्यामुळे चोरटय़ांनी बंद घरांना आपले लक्ष्य बनविले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पोलिसांची गस्त वाढवून चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.