वार्ताहर/ हिंडलगा
हिंडलगा ग्राम पंचायतीच्या निवडणुकीसाठी वॉर्ड क्रमांक 2 मधून ग्राम विकास लोकशाही आघाडीतर्फे उभे असलेले उमेदवार व ग्राम पंचायत माजी अध्यक्ष रामचंद्र आण्णाप्पा मन्नोळकर यांच्या प्रचारार्थ शनिवारी (दि. 19) रामदेव गल्ली, नवीन वसाहत, लक्ष्मी गल्ली, कलमेश्वरनगर आदी भागात भव्य प्रचारफेरी काढून मतदारांशी संपर्क साधण्यात आला.
हिंडलग्याच्या विकासाला चालना देण्यासाठी रामचंद्र मन्नोळकर हे सलग चौथ्यांदा निवडणुकीला उभे असून आपल्या सामाजिक आणि विकासाभिमुख कार्यामुळे ग्रामस्थांचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे मतदारांचाही मन्नोळकर यांना भरघोस पाठिंबा लाभत आहे. हिंडलग्याचा सर्वांगीण विकास कशाप्रकारे साधता येईल, हा मुख्य उद्देश समोर ठेवून त्यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली आहे.
यासाठी ग्राम विकास लोकशाही आघाडीची स्थापना करून आपल्या पॅनेलद्वारे सर्व उमेदवारांच्या विजयासाठी जोरदार प्रचार सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार श्री. मन्नोळकर व पॅनेलमधील उमेदवारांच्या उपस्थितीत गावामध्ये भव्य प्रचारफेरी काढून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या. यावेळी सर्व उमेदवार, समर्थक व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.