4 लाखाचा ऐवज पळविला : टिळकवाडी पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी /बेळगाव
आर. के. मार्ग हिंदवाडी येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून सुमारे 4 लाखाचा ऐवज चोरटय़ांनी पळविला आहे. बुधवारी दुपारी चोरीचा प्रकार उघडकीस आला असून सायंकाळी टिळकवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
यासंबंधी यशकुमार राजेंद्र हनबरट्टी यांनी फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती समजताच टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार, उपनिरीक्षक एम. वाय. कारिमनी व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चोरटय़ांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले.
यशकुमार हे बुधवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास आपल्या घराला कुलूप लावून कामावर गेले होते. ते इलेक्ट्रीक कॉन्टॅक्टर आहेत. त्यांची पत्नी कॉलेजला गेली होती. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ते घरी परतले. त्यावेळी दरवाजा उघडा होता. चोरटय़ांनी कडीकोयंडा तोडल्याचे निदर्शनास आले.
अडीच तासात चोरटय़ांनी साधला डाव
यशकुमार यांच्या घरातील 120 ग्रॅम सोन्याचे दागिने, अर्धा किलो चांदी, 49 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 4 लाख रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज चोरटय़ांनी पळविला आहे. भरदिवसा केवळ अडीच तासात चोरटय़ांनी डाव साधला असून या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. टिळकवाडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.