हिंडलगा : बेळगावहून गावाकडे प्रवास करताना एका सैन्यदलाच्या जवानाची वाटेमध्ये सापडलेली पर्स व महत्त्वाची कागदपत्रे मण्णूर येथील हिंदवी स्वराज्य युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे परत करून माणुसकी अजुनही जीवंत असल्याचे दाखवून दिले आहे.
गोजगा येथील सैन्यदलाचा जवान सागर कल्लाप्पा भातकांडे हे आपल्या दुचाकीवरून गावाकडे जात असताना त्यांच्या खिशातील पर्स रस्त्यावर पडली होती. त्यामध्ये काही पैसे व महत्त्वाची कागदपत्रे होती. सदर पर्स मण्णूरमधील मोतीबाग गल्लीतील कार्यकर्ते बाळू शहापूरकर व त्यांच्या मित्रांच्या नजरेस पडली. त्यातील कागदपत्राची तपासणी केल्यानंतर पर्स ही गोजगा येथील जवानाची असल्याचे समजले. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सुजीत मंडोळकर यांच्याशी संपर्क साधून त्यांनी गोजगा येथील जवान सागर भातकांडे यांच्याकडे पर्स व कागदपत्रे सुपूर्द केली.
यावेळी बाळू शहापूरकर, सुजीत मंडोळकर, जयवंत मंडोळकर, किरण चौगुले, राकेश नौकुडकर, आकाश बाळेकुंद्री यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.