लोकमान्य परिवार-रसिक रंजनतर्फे ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ कार्यक्रम
प्रतिनिधी/ बेळगाव
लोकमान्य परिवार आयोजित, रसिक रंजन निर्मित व प्रस्तुत ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ या जुन्या लोकप्रिय हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमाला बेळगावच्या चोखंदळ रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. लोकमान्य रंगमंदिरमध्ये झालेल्या कार्यक्रमात बेळगावातील तरुण कलाकारांनी जुनी लोकप्रिय गाणी प्रस्तुत केली व रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.
अतिशय अवघड गाणी या सर्व कलाकारांनी लीलया पेश करून आपल्या कलेची चुणूक दाखवली. ‘मिल मिल के गायेंगे’, ‘तेरा जलवा जिसने देखा’, ‘डम डम डिगा डिगा, ‘दिल की गिरह खोल दो’, ‘तेरी नैनोंने चोरी किया’, झूमता मौसम अशी अनेक लोकप्रिय गाणी सादर केली. सर्व कलाकारांनी कार्यक्रमाची सांगता कव्वाली गाऊन केली व कार्यक्रमाला एका अत्त्युच्च पातळीवर नेऊन ठेवले. तलत मेहमूद, मन्ना डे, किशोर कुमार, मोहम्मद रफी, हेमंत कुमार, गीता दत्त, सुरैय्या, लता मंगेशकर, आशा भोसले अशा विविध दिग्गज कलाकारांचे हुबेहुब आवाज सादर करून रसिकांची वाहव्वा मिळवली.
प्रेक्षकांनी अनेक गाण्यांसाठी ‘वन्स मोअर’ची मागणी केली. अनुष्का आपटे, श्रीवत्स हुद्दार, काजल धामणेकर, तन्वी इनामदार, अब्दुल रहीम, रिहान व किरण जोरापूर या बेळगावच्या तरुणाईनी गीते सादर करून रसिकांना स्वरानंद दिला. या कार्यक्रमात सर्व कलाकार व दिग्दर्शकांनी घेतलेली मेहनत क्षणोक्षणी दिसून येत होती. कार्यक्रमाची संकल्पना, मांडणी व दिग्दर्शन प्रा. अनिल चौधरी यांचे होते.
यावेळी प्रा. अनिल चौधरी, एस. पी. उपाध्ये, सचिन पवार व गुरुदत्त पेडणेकर यांचा विशेष योगदानासाठी सत्कार करण्यात आला. सर्व कलाकारांची ओळख डी. जी. कुलकर्णी यांनी करून दिली. याप्रसंगी लोकमान्य सोसायटीचे संचालक गजानन धामणेकर, आर. आर. कुलकर्णी, नितीन नेर्लेकर, स्वाती हुद्दार, एस. पी. उपाध्ये यांच्या हस्ते सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
नितीन कपिलेश्वरकर यांनी आभार मानले. यावेळी लोकमान्य सोसायटीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.