अडकून पडलेल्या जहाजाचे दोन तुकडे होण्याची भीती : सागरी जीवसृष्टी संकटात
वृत्तसंस्था/ पोर्ट लुइस
हिंदी महासागरात मॉरिशसच्या किनाऱयावर 25 जुलैपासून अडकून पडलेले जपानचे जहाज आता कुठल्याही क्षणी दोन तुकडय़ांमध्ये विभागले जाऊ शकते. या जहाजावर 2,500 मेट्रिक टन कच्चे तेल आहे. यातील 1 हजार टन कच्च्या तेलाची गळती झाली आहे. समुद्राच्या पृष्ठभागावरील कच्चे तेल हटविण्यासाठी कार्यरत स्वयंसेवकांना जहाजाला तडे गेल्याचे दिसून आले आहे. हे जहाज तुटल्यास हजारो सागरी जीव मारले जाण्याचा धोका आहे. याचबरोबर पर्यावरणाचीही प्रचंड हानी होऊ शकते.
जहाजावर कच्च्या तेलाने भरलेले 3 टँक आहेत. यातील एका टँकमधून गळती सुरू झाली होती. सद्यस्थितीत या टँकची दुरुस्ती करण्यात आली आहे. अडकून पडलेल्या जहाजातील कच्चे तेल अन्य जहाजांच्या मदतीने काढण्याची मोहीम सुरू आहे. जहाजावर अद्याप 2,500 मेट्रिक टन कच्चे तेल आहे. जहाजावरील कच्चे तेल हटविण्याचे काम वेगाने सुरू असल्याची समजते.
पर्यावरणीय आणीबाणी
मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांनी याप्रकरणी 8 ऑगस्ट रोजी पर्यावरणीय आणीबाणी घोषित केली होती. देशाच्या पर्यावरणाशी निगडित हे मोठे संकट आहे. ब्ल्यू बे मरीन पार्क रिझर्व्ह आणि बेटानजीक तेलगळती झाली आहे. तेलगळतीमुळे सागरी जीव आणि प्रवाळांच्या अनेक प्रजातींना धोका आहे. तेलगळतीनंतर मॉरिशसच्या अनेक सागरकिनाऱयांवर पाण्याचा रंग काळवंडला आहे.
फ्रान्स, जपानची मदत
फ्रान्सचे पंतप्रधान इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी स्वतःच्या बचावपथकांना मॉरिशससाठी रवाना केले आहे. जपाननेही स्वतःचे 6 सदस्यीय आपत्ती निवारण पथक पाठविले आहे. कच्चे तेल हटविण्यासाठी 400 सी बूमचा वापर होत आहे. याचबरोबर हजारो स्वयंसेवकही देखील मदत करत आहेत.
खराब हवामानामुळे जहाजाचे नुकसान
एमव्ही वकाशियो कार्गो शिप मिटसुई ओएसके लाइन्स या जपानी कंपनीच्या मालकीचे आहे. चीनमधून ब्राझीलच्या दिशेने जात असताना खराब हवामानामुळे या जहाजात दोन आठवडय़ांपूर्वी तांत्रिक बिघाड झाला होता. तसेच जहाजाच्या खालील भागाला तडा गेला होता. तेलगळतीप्रकरणी कंपनीने माफी मागितली आहे. मॉरिशस सरकारच्या मदतीसाठी तज्ञांचे पथक पाठविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कंपनीने दिली आहे.