प्रतिनिधी/ बेळगाव
राणी चन्नम्मा विद्यापीठाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पदवी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी युजीसी मार्गसुचीनुसार सीबीसीएस अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत डॉ. राजेंद्र पोवार यांनी संपादित केलेल्या हिंदी विषयाच्या चार पाठय़पुस्तकांचे प्रकाशन शुक्रवारी आरपीडी महाविद्यालयात करण्यात आले.
विद्यापीठातील हिंदी प्राध्यापक संघातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष के. एन. मूर्ती होते. प्रमुख पाहुणे म्हणून आरपीडी व जीएसएस महाविद्यालयांच्या व्यवस्थापन मंडळाचे चेअरमन शरद वालावलकर उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाचे चेअरमन डॉ. एल. एच. अत्तार व प्राचार्या अचला देसाई उपस्थित होत्या.
डॉ. शंकरमूर्ती के. एन. यांनी स्वागत केले व नवीन पाठय़क्रमाबद्दल माहिती दिली. आरपीडी विभागाचे हिंदी विभागप्रमुख डॉ. राजेंद्र पोवार व बेंगळूरच्या विवेकानंद कॉलेजचे हिंदी विभागप्रमुख डॉ. मदन मोहन रेड्डी विद्यापीठाच्या हिंदी अभ्यास मंडळाचे सदस्य असून त्यांना विद्यापीठ अभ्यास मंडळाच्या डॉ. मनीषा नेसरकर यांची पाठय़क्रम वेळेत तयार करण्यासाठी मदत झाली.
यावेळी एकूण कहाणी कुंज, प्रतिनिधी कहाणीयाँ, गद्य चयन व गद्य फुलवारी या पुस्तकांचे प्रकाशन झाले. डॉ. अत्तार यांनी सर्व पुस्तकांच्या साहित्य प्रकाराचा आढावा घेतला. शरद वालावलकर व डॉ. अचला देसाई यांनीही आपले विचार व्यक्त केले. प्रा. विजयकुमार पाटील यांनी आभार मानले.