प्रवीण कांबळे/ लांजा
कोकणातील अनोख्या निसर्ग सौंदर्यामुळे मराठी, हिंदी कलाकार, निर्माते चित्रपट व मालिकांच्या चित्रीकरणासाठी कोकणाकडे आकर्षित होत आहेत. लांजा तालुक्यातील खेरवसे येथील रामानंद बंगल्यात ‘शॅडो गेम’ या हिंदी वेब सिरीजचे चार दिवसांचे चित्रीकरण नुकतेच पार पडले. त्यानिमित्ताने संग्राम समेळ व जुई गडकरी, एकनाथ गीते, वैभव आंबेकर, ललित आदी कलाकार येथे दाखल झाले होते. या कलाकारांनी खेरवसे परिसरातील निसर्गाचे कौतुक केले.
स्पेक्ट्रम क्रिएशन्स व इव्हेंट डायरिज निर्मित ‘शॅडो गेम’ या रहस्यमय हिंदी वेब सिरीजचे चित्रीकरण खेरवसे येथील रामचंद्र महाडिक यांच्या रामानंद या बंगल्यात करण्यात आले. या वेबसिरीजमध्ये संग्राम समेळ, एकनाथ गीते, वैभव आंबेकर, अंकिता राऊत, जुई गडकरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. खेरवसे येथील प्रवीण कांबळे, लांजातील शोहेब पटेल, पूजा कुरले, सुप्रिया कुरले हे स्थानिक कलाकाही या वेब सिरीजमध्ये भूमिका बजावत आहेत.
शॅडो गेम या रहस्यमयी वेबसिरीजचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक चेतन किंजळकर व निखिल कटारे यांचे असून विनायक चव्हाण, अभिषेक वाघ व लांजा तालुक्याचे सुपुत्र संदेश नेवरेकर हे निर्माते आहेत. पॅमेरामन प्रथमेश कुलकर्णी, रेड प्राईम चॅनेल मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप राठोड यांची ही विशेष संकल्पना आहे. चित्रीकरणाचा शुभारंभ लांजा शिवसेना शहरप्रमुख गुरूप्रसाद देसाई यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तर नगरसेवक संजय यादव यांच्या हस्ते गणेश प्रतिमा पूजनाने झाला. यावेळी लांजाच्या नगरसेविका दुर्वा भाईशेटय़े, नगरसेवक स्वरूप गुरव, प्रसाद भाईशेटय़े, मुख्याध्यापिका संगीता लाखण, प्राचार्य अमोल जाधव, संस्थेचे कार्याध्यक्ष रमेश लाखण उपस्थित होते.
दोन वर्षांपूर्वी शिमगासह अनेक शॉर्टफिल्म, गाण्यांचे चित्रीकरण खेरवसे, बेनी परिसरात झाले आहे. चित्रिकरणात सहभागी झालेल्या कलाकारांनी येथील निसर्गाचे कौतुक केले असून यापुढेही या भागात चित्रीकरणास पसंती दिली आहे. शॅडो गेम या रहस्यमयी वेबसिरीध्ये एका घरात घडलेल्या मृत्यूचे रहस्य कसे उलघडत जाते हे दाखविण्यात आले आहे.
…