प्रतिनिधी /फोंडा
होळीच्या सणाच्या निमित्ताने होणारे गैरप्रकार रोखून धार्मिक उत्सवाचे पावित्र्य राखा. होळी उत्सवाच्या निमित्ताने बनावटी रंग, पिचकाऱया, फुगे आदींच्या विक्रीवर बंदी घाला, अशी मागणीवजा निवेदन हिंदु जनजागृती समितीने फोंडा येथील उपजिल्हाधिकारी आणि फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांना सादर केले आहे.
यावेळी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये श्रीराम खेडेकर, राम वैद्य, सनातन संस्थेच्या सौ. हर्षा गुरव व धर्मप्रेमी नयन नाईक उपस्थित होत्या. हिंदु जनजागृती समितीने या निवेदनात म्हटले आहे की दुष्प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत्प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव म्हणजे होळी. होळीच्या दिवशी दारू पिऊन धिंगाणा घालणे रंगपंचमीला स्त्रियांवर रंग उडविणे त्याची छेड काढणे त्याच्याकडे पाहून अश्लील अंगविक्षेप करणे, घाणेरडया पाण्य़ाचे फुगे मारणे तसेच आरोग्याला घातक असणारे रंग फासणे आदी प्रकार वाढत चालत आहे. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीने रंग खेळणे, पादचारी आणि स्त्रिया यावर फुगे मारणे, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान-ध्रुमपान करणे आणि पाटर्या करणे यास प्रतिबंध करण्यात यावा. आरोग्याला घातक तसेच प्रतिबंधित रसायनिक रंगांची विक्री करण्यावर आणि बळजबरीने रंग फासून फुगे मारण्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.