नव्या संघटनेची निर्मिती – अन्यायाविरोधात समाजाला सशक्त करणार
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केरळमधील विविध हिंदू आश्रम आणि महंतांनी हिंदू समुदायाच्या मुद्दय़ांच्या लढाईसाठी एक नवे व्यासपीठ तयार केले आहे. याचे नाव केरळ धर्माचार्य सभा (केडीएस) ठेवण्यात आले आहे. हे व्यासपीठ हिंदू समुदायासमोर उभ्या ठाकणाऱया सर्व मुद्दय़ांवर एक अधिकृत भूमिका निर्माण करणार आहे.
कोचीमध्ये आयोजित एका बैठकीत प्रमुख आश्रम आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला. या बैठकीत कोझिकोडमधील अद्वैत आश्रामचे स्वामी चिदानंद पुरी हे केडीएसचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. तर अलुवामधील तांत्रिक विद्या पीठहोमचे मुल्लापल्ली कृष्णन नंबुद्री यांची महासचिव म्हणून निवड झाली आहे. या व्यासपीठात 23 सदस्यीय कार्यकारिणी समिती असून यात स्वामी आणि पुजारी सामील आहेत.
विविध हिंदू संघटनांची संघटना केरळ हिंदू ऐक्यावेदीकडून केडीएसला संघ परिवाराचा पाठिंबा प्राप्त असल्याचे सांगण्यात आले. हिंदू समुदायाला प्रभावित करणाऱया सर्व मुद्दय़ांवर केडीएस विचारविनिमय करणार असून यात मंदिरातील विधींशी संबंधित मुद्दे देखली सामील आहेत. या मुद्दय़ांवर एकीकृत दृष्टीकोन असणार आहे. शबरीमलामधील महिलांच्या प्रवेशासारखे मुद्दे समोर येतात तेव्हा हिंदू आचार्यांपेक्षा वेगळे मत असू नये. आमच्या संघटनेत सर्व प्रमुख आश्रमांचे प्रतिनिधी आहेत. मोठय़ा संख्येत संन्याशांनी या पुढाकारासाठी समर्थन दिल्याचे नंबुद्री यांनी सांगितले आहे.