जिल्हाधिकाऱयांना निवेदनाद्वारे इशारा
प्रतिनिधी /बेळगाव
सार्वजनिक मंदिरे तसेच प्रार्थनास्थळे हटविण्याचा आदेश दिल्याच्या निषेधार्थ आता विविध संघटना जिल्हाधिकाऱयांना निवेदन देत आहेत. बेळगाव शहर देवस्थान मंडळाच्यावतीने निवेदन देऊन मंदिरांना धक्का जरी लागला तरी हिंदू गप्प बसणार नाहीत, असा इशारा देण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने याबाबतचा आदेश काढला असून शहरातील काही मंदिरांच्या विरोधात नोटिसा बजावण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र ही मंदिरे 100 ते 150 वर्षांपूर्वीची आहेत. त्यामुळे ही मंदिरे अधिकृतच आहेत. तेव्हा अशा मंदिरांवर आता अनधिकृत म्हणून कारवाई करत असाल तर बेळगावातील जनता तुम्हाला चांगलाच धडा शिकवेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. केवळ हिंदूंच्याच मंदिरांना लक्ष्य बनविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत आम्ही हिंदू मंदिरांना हात लावू देणार नाही, असा इशारा देखील देण्यात आला आहे. शहर देवस्थान मंडळाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.