नवी दिल्ली / वृत्तसंस्था
निवडणुकीच्या काळात भाजपपेक्षाही धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणारे विरोधी पक्षच धर्माचा दुरुपयोग जास्त प्रमाणात करीत असून हिंदू धर्माचा द्वेष करण्याची स्पर्धा त्यांच्यात सुरु आहे, अशी टीका भाजपने केली आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी यासाठी काँगेस आणि समाजवादी पक्षाला धारेवर धरले आहे.
इस्लामी धार्मिक नेते मौलाना तौकीर रझा खान यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला समर्थन दिले आहे. तर समाजवादी पक्षाने धार्मिक दंगलीत सहभागी असण्याचा आरोप असणाऱया तसेच प्रक्षोभक धार्मिक वक्तव्ये करणाऱया मुस्लीम नेत्यांना तिकिटे दिली आहेत. यावरुन हे पक्ष धर्माचा दुरुपयोग निवडणूक काळात कसा करतात हे सर्वांना दिसून आले आहे. हेच पक्ष भाजपवर उलटा आरोप करतात, हा त्यांचा कांगावा आहे. या दुटप्पी वर्तणुकीमुळे हे पक्ष उघडे पडले असून मतदार त्यांना क्षमा करणार नाहीत, असे प्रतिपादन पात्रांनी केले.
सध्या कारागृहात असणाऱया निहाद हसन यांना सपने तिकीट दिले आहे. तर मुहर्रम अली या आणखी एका उमेदवारालाही तिकीट देण्यात आले आहे. या उमेदवारावर धार्मिक दंगली घडविण्याचा आरोप आहे. या तसेच आणखी काही उमेदवारांमुळे समाजवादी पक्षाने घोषित केलेली पहिली उमेदवार सूची वादात सापडली आहे. या सूचीमुळे समाजवादी पक्षातच मतभेद होत आहेत.