काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावरून वातावरण तापले
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी त्यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना इस्लामी दहशतवादी संघटनांशी केल्यामुळे प्रचंड वाद निर्माण झाला आहे. सलमान खुर्शीद स्वतःची भूमिका मांडत नसून काँग्रेसची आजवरची विचारसरणी या पुस्तकातून स्पष्ट करीत आहेत. असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. काँग्रेसच्या रक्तातच हिंदुत्वाविषयीचा द्वेष भरलेला आहे अशी खोचक टिपणी भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली.
हिंदू धर्म आणि हिंदुत्व या दोन वेगवेगळय़ा संकल्पना आहेत अशी टिपणी शुक्रवारी राहुल गांधी यांनीही सलमान खुर्शीद यांच्या समर्थनार्थ केली आहे. या टिपणीचा समाचारही पात्रा यांनी घेतला. संधी मिळताच हिंदुत्वावर तेंडसुख घेणे ही काँग्रेसला आणि नेहरु गांधी कुटुंबाला जडलेली सवय आहे. आजवर अनेकवेळा त्यांनी हिंदुत्वाला अवमानित केले असून तसे करण्यात त्यांना धन्यता वाटते. सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकात मांडण्यात आलेली भूमिका काँग्रेसच्या तत्वज्ञानापेक्षा वेगळी नाही. काँग्रेसने अशाप्रकारे नेहमीच हिंदू समाज आणि हिंदुत्वाच्या संकल्पनेला मलीन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशी टीका पात्रा यांनी केली.
इतर धर्मांचे काय?
काँग्रेसने हिंदू आणि हिंदुत्व हे वेगळे असल्याचे दिशाभूल करणारे विधान केले आहे. असे विधान अन्य धर्मांसंबंधी करण्याचे साहस काँग्रेसला होईल काय? असा प्रश्नही पात्रा यांनी विचारला. शुक्रवारीच काँग्रेसचेच आणखी एक ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी हिंदुत्व आणि इस्लामी दहशतवादी संघटनांची तुलना करण्याच्या संदर्भात खुर्शीद यांच्यावर कठोर टीका केली होती. हिंदुत्व अणि इस्लामी दहशतवाद यांना एकाच तराजूत तोलणे धादांत अयोग्य आहे. खुर्शीद यांना हिंदुत्व समजलेले नाही, अशी जळजळीत टीका गुलाम नबी आझाद यांनी केली होती.