वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानात हिंदू मंदिरांवर मोठय़ा प्रमाणात हल्ले होत असून गेल्या काही दिवसांत अनेक मूर्त्यांची तोडफोड करण्यात आली आहे. हिंदू मंदिरांना संरक्षण देण्यात अपयशी ठरल्याबद्दल तेथील सर्वोच्च न्यायालयाने पाकिस्तान सरकारवर ताशेरे झाडले आहेत. अशा घटनांमुळे पाकिस्तानची प्रतिमा आंतरराष्ट्रीय समुदायासमोर डागाळली असल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले.
पाकिस्तान उच्च न्यायालयाने या प्रकारांची दखल स्वतःहून घेऊन पाकिस्तान सरकारला स्पष्टीकरण देण्यासाठी पाचारण केले होते. तत्पूर्वी पाकिस्तानातील हिंदू मंडळाचे अधिकारी डॉ. रमेश कुमार यांनी मुख्य न्यायाधीशांची भेट घेऊन त्यांना कठोर कारवाई करण्यासंबंधी निवेदन दिले होते.
सुनियोजित हल्ले
सिंध प्रांतातील कराची तसेच पंजाब प्रांतातील अनेक मंदिरांवर गेल्या महिनाभरात हल्ले झालेले आहेत. शेकडो लोकांनी एकत्र येऊन लाठय़ाकाठय़ा आणि दगडांच्या साहाय्याने मंदिरे पाडली आहेत. हे हल्ले अल्पसंख्य हिंदू समाजाला घाबरविण्यासाठी आणि त्याचे मोठय़ा प्रमाणावर धर्मांतर करण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप डॉ. रमेश कुमार यांनी केला. हिंदू मुलींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर करून सक्तीने त्यांचा मुस्लिमांशी विवाह लावून देण्याचे प्रकारही गेल्या काही महिन्यात वाढले आहेत.
मुलाच्या सुटकेविरोधात हिंसा
कराची येथील एका न्यायालयाने बनावट आरोपांखाली पकडण्यात आलेल्या नऊ वर्षाच्या एका हिंदू मुलाची सुटका करण्याचा आदेश काही दिवसांपूर्वी दिला होता. या आदेशाच्या विरोधात तेथील धर्मांध मुस्लिमांनी मोर्चा काढून मोठय़ा प्रमाणात हिंसाचार केला. याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने पाक सरकारला जाब विचारला. सरकारच्यावतीने गुळमुळीत उत्तर देण्यात आल्याने सर्वोच्च न्यायालयाने कठोर ताशेरे ओढले.