अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा : व्हाइट हाउससमोरील निदर्शकांना हटविले, विविध शहरांमध्ये संचारबंदी कायम
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेत कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉयड याचा पोलिसांच्या हातून मृत्यू झाल्यानंतर 7 दिवसांपासून निदर्शने आणि हिंसाचार सुरू आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा निदर्शकांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी स्वतःला ‘लॉ अँड ऑर्डर प्रेसिडेंट’ संबोधिले आहे. हिंसाचार सुरू राहिल्यास सैन्य तैनात केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सोमवार रात्रीपासूनच पोलिसांनी निदर्शकांवर रबरी गोळय़ा आणि अश्रूधूराचा मारा केला आहे. व्हाइट हाउससमोरील निदर्शकांना हटविण्यासाठी बळाचा वापर करण्यात आला आहे. 5 पोलिसांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे.
फ्लॉयड याच्या मृत्यूनंतर अमेरिकेच्या बहुतांश प्रांतांमध्ये निदर्शने आणि हिंसाचार सुरू आहे. 7 दिवस उलटल्यावरही बहुतांश प्रांतांमध्ये हिंसाचार, जाळपोळ आणि लुटीचे प्रकार रोखण्यास यश आलेले नाही. अध्यक्षांचे आवाहन आणि इशाराही याप्रकरणी उपयुक्त ठरला नाही. जॉर्ज याच्यासोबत झालेल्या क्रौर्याच्या घटनेने सर्व अमेरिकन नागरिक दुःखी आहेत. जॉर्जला अवश्य न्याय मिळणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
फ्लॉयडच्या मृत्यूस जबाबदार सर्व 4 पोलीस अधिकाऱयांना बडतर्फ करण्यात आले आहे. फ्लॉयडच्या मानेवर गुडघा दाबून ठेवणऱया पोलीस अधिकाऱयाला 27 मे रोजी अटक करण्यात आली असून त्याच्यावर थर्ड डिग्री हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे.
अंत्यसंस्काराचा खर्च उचलणार
बॉक्सिंग चॅम्पियन फ्लॉयड मेवेदरने जॉर्ज याच्या अंत्यसंस्काराचा पूर्ण खर्च उचलणार असल्याचे म्हटले आहे. याचबरोबर जगप्रख्यात गोल्फपटू टायगर वुड्स यांनी ट्विट केला आहे. जॉर्ज यांचे कुटुंब आणि ज्यांना नुकसान पोहोचले अशांसाठी माझे मन त्रस्त झाले आहे. बळाचा वार कधी आणि कसा करावा हे समजून घेण्यासाठी पोलीस कर्मचारी मोठी मेहनत घेतात. परंतु यावेळी ही हैराण करणारी घटना घडल्याचे वुड्स यांनी म्हटले आहे.
दंगलग्रस्त प्रांतांची स्थिती
मिनेसोटा : प्रांताची राजधानी सेंट पाउलमध्ये पोलिसांनी सोमवारी 66 निदर्शकांना अटक केली आहे. शहरात संचारबंदी लागू असून देखील मोठय़ा प्रमाणात निदर्शने होत आहेत.
इलिनॉयस : शिकागो शहरात निदर्शनांदरम्यान 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 60 जणांना अटक करण्यात आली आहे. सिसरो टाउनमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. गोळीबार करणारे आरोपी शहराबाहेरील होते, अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.
मिसौरी : येथील अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने होत आहेत. सेंट लुईस शहरात निदर्शकांच्या गोळीबारात 4 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.