काश्मीरमधील चकमकीत सुरक्षा दलाला मोठे यश
श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने हिजबुल मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेचा कमांडर मेहराजुद्दीनला कंठस्नान घातले आहे. उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्हय़ातील हंदवाडामध्ये बुधवारी सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक उडाली. या चकमकीत हिजबुलचा कमांडर मेहराजुद्दीन ठार झाला आहे. काश्मीर खोऱयात मेहराजुद्दीनने अनेक दहशतवादी कारवाया केल्या होत्या अशी माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली आहे. 27 जून रोजी जम्मू काश्मीरचे पोलीस अधिकारी फय्याज अहमद भट यांच्या घरात घुसून दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. त्यात भट आणि त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला होता. तर या हल्ल्यात भट यांची 21 वर्षाची कन्या गंभीर जखमी झाली होती. दुसऱया दिवशी पहाटे तिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
लष्करी सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, चकमकीत ठार झालेला मेहराजुद्दीन उर्फ उबैद हा हिजबुल मुजाहिद्दीनचा सर्वात जुना कमांडर होता. हंदवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चकमक पोजीपोरा भागात झाली. पोलीस, सैन्य आणि सीआरपीएफ यांच्याकडून त्या भागात शोधमोहीम राबविताना ही कारवाई करण्यात आली. चकमकीदरम्यान सामान्य नागरिकांचे नुकसान होऊ नये म्हणून हा परिसर रिकामा करण्यात आला होता, असे काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी सांगितले. मेहराजुद्दीन हा खोऱयात गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी हल्ले करण्यासाठी कट रचत होता. चकमकीत त्याला ठार मारल्यामुळे सुरक्षा जवानांना मोठे यश आले आहे. मेहराजुद्दीन हिजबुलचा सर्वात जुना आणि टॉप कमांडर होता. तो गेल्या अनेक वर्षांपासून दहशतवादी संघटनेसाठी कार्यरत होता.