कठोर कारवाईचा इशारा
बेळगाव : शुक्रवारी पुन्हा सदाशिवनगरातील पॅरामेडिकल कॉलेज आवारात हिजाबवरून वादंग उठले. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी घटनास्थळी भेट देऊन वाद शमविला. दरम्यान, शहरातील विविध महाविद्यालयांत विद्यार्थिनींची अरेरावी सुरूच असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. यामुळे कठोर कारवाईचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
बुधवारपासून महाविद्यालये सुरू झाल्यानंतर शहरातील महाविद्यालयात हिजाब परिधान करून प्रवेश करणाऱया विद्यार्थिनींची संख्या वाढली आहे. लिंगराज महाविद्यालयानंतर सदाशिवनगरातील विजया फार्मामेडिकल कॉलेजमध्ये गुरुवारी काही विद्यार्थिनींनी हिजाब परिधान करून प्रवेश केला.
यावरून तणाव निर्माण झाला होता. हिजाब परिधान करू नये, अशी सूचना कॉलेज व्यवस्थापनाने केली असतानाही शुक्रवारी पुन्हा त्या विद्यार्थिनी हिजाब परिधान करून आल्या. त्यांना प्रवेशद्वारात अडविल्यानंतर त्यांनी घोषणाबाजी केली.
याप्रसंगी कार्यकर्त्या सीमा इनामदार यांनी हिजाबधारी विद्यार्थिनींना प्रवेश द्यावा, यासाठी कॉलेज प्रशासनावर दबाव आणला. गोंधळ वाढल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अरेरावी करणाऱया विद्यार्थिनींना परीक्षा केंद्रात (वर्गात) हिजाब उतरवून बसण्याची सूचना करून त्यांना प्रवेश देण्यात आला. पण परीक्षा संपेपर्यंत त्यांनी हिजाब उतरविला नव्हता. परिस्थिती बिघडू नये, यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कॉलेज आवारात इतरांना प्रवेश निशिद्ध करण्यात आला होता.
हिजाबवरून वादाचे प्रसंग वाढत असल्याने शहरातील बहुतेक सर्व महाविद्यालयांना कडक पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आला होता. विजया पॅरामेडिकल कॉलेज वगळता अन्यत्र कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.
कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱयांवर कडक कारवाई
हिजाब परिधान करून येणाऱया विद्यार्थिनींना सूचना करण्यात आली आहे. वर्गात हिजाब किंवा इतर वादग्रस्त कपडे परिधान करू नयेत, असे सूचविण्यात आले आहे. न्यायालयीन आदेशाची पायमल्ली करून कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱयांवर कडक कारवाई केली जाईल.
-एम. जी. हिरेमठ, जिल्हाधिकारी