प्रतिनिधी/ बेंगळूर
संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरलेल्या हिजाब प्रकरणाचा निकाल मंगळवार दि. 15 मार्च रोजी सकाळी 10ः30 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने याबाबतची माहिती दिली आहे.
शिक्षण संस्थांमध्ये हिजाब परिधान करण्यावर राज्य सरकारने निर्बंध घातले होते. या आदेशाविरोधात दाखल झालेल्या याचिकांवर उच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय पीठाने 11 दिवस सुनावणी करून निकाल राखून ठेवला होता. मुख्य न्यायाधीश रितुराज अवस्थी, न्या. कृष्ण एस. दीक्षित आणि न्या. जे. एम. काझी यांच्या पीठाने या प्रकरणावर सुनावणी केली आहे.
उडुपी येथील सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयाने हिजाब परिधान करून येण्यास निर्बंध घातले होते. याविरोधात या महाविद्यालयातील पाच विद्यार्थिनींनी गणवेशाबरोबर हिजाब घालून येण्याची परवानगी द्यावी, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यानंतर राज्य सरकारने 5 फेब्रुवारी रोजी शिक्षण संस्थांमध्ये हिजाबवर बंदी घातली होती. सुरुवातीला न्या. कृष्णा एस. दीक्षित यांच्या एकसदस्यीय पीठासमोर सुनावणी झाली होती. या पीठाने दोन दिवस सुनावणी करून हे प्रकरण विस्तृत पीठाकडे वर्ग केले होते. त्यानुसार मुख्य न्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय पीठाने 10 फेब्रुवारीपासून सुनावणी सुरू केली होती. 11 फेब्रुवारी रोजी या पीठाने अंतरिम आदेश देताना अंतिम निकाल येईपर्यंत धार्मिक संकेत असणारे कपडे परिधान करून येऊ नये, असे सांगितले होते.