होळीच्या सुटीनंतर सर्वोच्च न्यायालय विचार करणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
शिक्षणसंस्थांमध्ये विद्यार्थ्यांनी संस्थेने निर्धारित केलेला गणवेशच परिधान केला पाहिजे, या कर्नाटक सरकारच्या आदेशाला वैध ठरविणाऱया कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात केलेल्या विशेष याचिकेवर त्वरित सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय घटनापीठाने मंगळवारी हा निर्णय दिला होता.
या निर्णयाविरोधात एका मुस्लीम विद्यार्थिनीने सर्वोच्च न्यायालयात विषेश याचिका (स्पेशल लीव्ह पिटिशन) मंगळवारीच सादर केली होती. या याचिकेवर त्वरित सुनावणी करावी. विद्यार्थिनींच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. त्यांना परीक्षेला बसायचे असल्यामुळे सुनावणी लवकरात लवकर घ्यावी, अशी मागणी याचिकाकर्तीचे वकील संजय हेगडे यांनी सरन्यायाधीश रामण्णा यांनी केली.
तथापि, या याचिकांचे लिस्टिंग करण्यासंबंधी आत्ताच निर्णय घेतला जाणार नाही. होळीच्या सुटीनंतर तो घेतला जाईल. होळीची सुटी तीन दिवस असून ती गुरुवारपासून सुरु होत आहे. त्यानंतर रविवार आहे. त्यामुळे सोमवारपासून पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे काम सुरु होणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले. तेव्हा सोमवारी लिस्टिंग केले जावे, असे हेगडे यांनी सुचविले. मात्र, तशी शाश्वती न्यायालयाने दिली नाही. परिणामी या याचिकेवरील प्राथमिक सुनावणी केव्हा होणार हे सुटीनंतरच ठरणार आहे, हे न्यायालयाच्या भूमिकेवरुन स्पष्ट झाले.