ऑनलाईन टीम / तरुण भारत
कर्नाटकसह देशभर वादाचे अऩेक प्रसंग निर्माण करणाऱ्या हिजाब प्रकरणावर निकाल देणाऱ्या न्यायमूर्तींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रितुराज अवस्थी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा व्हिडीओ समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अॅड. उमापती एस यांनी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदार उमापती यांनी तक्रारीत न्यायमूर्तींना जीवे मारण्याची धमकी देणारा व्हिडीओ व्हॉट्सअॅपवर आल्याचे सांगितले आहे. या पार्श्वभुमीवर न्यायाधीशांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.सरन्यायाधीश ऋतुराज अवस्थी यांना आता वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.
तसेच या प्रकरणात धमकी देणाऱ्या दोन आरोपींना तामिळनाडू पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. तिरुनेलवेली येथे कोवई रहमतुल्लाला अटक करण्यात आली, तर ४४ वर्षीय एस जमाल मोहम्मद उस्मानी याला तंजावरमध्ये ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने हिजाब प्रकरणी निर्णय देताना वर्गात हिजाब घालण्यावर घातलेली बंदी कायम ठेवली आहे.