विरोधकांना वाटत आहे ध्रुवीकरणाची चिंता
कर्नाटकात गाजत असणारे हिजाब प्रकरण आता उत्तर प्रदेशपर्यंत पोहोचले आहे. या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापलेले असतानाच मुस्लीम विद्यार्थी हिजाबच्या मागणीसाठी अनेक ठिकाणी निदर्शने करीत आहेत. त्यामुळे हिंदू मतांचे ध्रुवीकरण होईल आणि भारतीय जनता पक्षाला त्याचा थेट लाभ होईल अशी चिंता विरोधकांना वाटू लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
उत्तर प्रदेशात काही मुस्लीम विद्यार्थिनींनी हिजाब घातल्याने त्यांना महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याची तक्रार केली. तसेच शिक्षकांनाही दोष दिला. त्यामुळे वातावरण तापले आहे. हिंदूंनीही हिजाबच्या आग्रहाला संघटीतरित्या विरोध चालविल्याचे दिसून येत आहे. निवडणूक ऐन भरात आली असताना हा मुद्दा उपस्थित झाल्याने आधीच धर्माच्या आधारावर ध्रुवीकरणाचे वातावरण असताना त्यात या मुद्याची भर पडली आहे. अलिगड मुस्लीम विद्यापीठातही हिजाबच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. विरोधी पक्ष यासाठी भाजपलाच जबाबदार धरत आहेत. भाजपने हेतुपुरस्सर हा मुद्दा उकरून काढल्याचा आरोप होत आहे.
भाजपचे प्रत्युत्तर
कर्नाटकात हिजाब प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना उत्तर प्रदेशात विरोधी पक्ष त्यावरून रान उठविण्याचा प्रयत्न करीत आहेत. हिजाबच्या निमित्ताने मुस्लीमांमधील धर्म भावनेला उत्तेजन देण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे असा प्रत्यारोप भाजपकडून करण्यात आला. प्रयागराज येथेही मुस्लीम विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. त्यांनी जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले. तथपि मुस्लीम विद्यार्थ्यांच्या या उघड निदर्शनांचा परिणाम म्हणून हिंदूंचेही दुसऱया बाजूला एकत्रीकरण होत असल्याची चिंता विरोधकांना सतावत आहे अशी माहिती राजकीय सूत्रांकडून देण्यात आली.