पत्नीच्या कपडय़ांचीही विक्री
जर्मनीचा हुकुमशहा अडॉल्फ हिटलरचा पर्सनल टॉयलेट सीट 18,750 अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 13,65,000 रुपयांमध्ये लिलावात विकला गेला आहे. दुसऱया महायुद्धादरम्यान एका अमेरिकन सैनिकाने हिटलरची ही सीट लुटली होती. महायुद्धादरम्यान जर्मन हुकुमशहा हिटलर मागे हटू लागलेला असताना अमेरिकेन सैनिक रेगनवाल्ड सी बोर्चने ते ताब्यात घेतले हेते.
हिटलरच्या ठिकाणावरील हल्ल्यादरम्यान आमच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी येथून जे काही उचलता येईल ते उचला असे सांगितले होते अशी माहिती रेगनवाल्ड देतात. अमेरिकन सैनिकाने या सीटला न्यू जर्सी येथील स्वतःच्या स्वतःच्या घरात ठेवले होते.
हुकुमशहाची पत्नी इवा यांची गुलाबी रंगातील नाइटीचाही लिलाव झाला आहे. खरेदीदाराने याकरता 1,750 डॉलर्सची बोली लावली होती. टॉयलेट सीट देखील लिलावात विकली गेली आहे. पत्नीचे कपडेही लोकांनी बोली लावून खरेदी केले, याहून अधिक हुकुमशहासोबत वाईट काय घडू शकते असे उद्गार लिलाव प्रक्रियेशी संबंधित एका अधिकाऱयाने काढले आहेत. याचबरोबर हिटलरचा हेअरब्रश आणि त्याच्या 4 केसांचाही लिलाव करण्यात आला आहे. हे केस हेअरब्रशमधून प्राप्त करण्यात आले होते आणि त्यासाठी 1650 पौंड प्राप्त झाले आहेत. जर्मन हुकुमशहाचा शेविंग मग आणि अन्य गोष्टींचाही लिलाव करण्यात आला आहे. हिटलरच्या तळावर पोहोचणाऱया पहिल्या अमेरिकन सैनिकांमध्ये रेगनवाल्ड यांचा समावेश होता, कारण त्यांना जर्मन आणि प्रेंच दोन्ही भाषा अवगत होत्या. ते फ्रान्स्च्या 2 आर्म्ड डिव्हिजनमध्ये संपर्क अधिकारी म्हणून काम करत होते.