जमिनीची रक्कम न दिल्याने न्यायालयाचा आदेश : शेतकऱयांना दिलासा
वार्ताहर/ यमकनमर्डी
भूसंपादन केलेल्या शेतकऱयांना देण्यात येणारी कोटय़वधीची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱयांनी अनेक वर्षांपासून हिडकल डॅम (ता. हुक्केरी) येथील भूसंपादन कार्यालयाकडे फेऱया मारल्या होत्या. मात्र, याकडे दुर्लक्षच केले जात होते. या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या आदेशानुसार सदर कार्यालयावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे जमीन दिलेल्या शेतकऱयांना दिलासा मिळाला आहे.
भूसंपादन कार्यालयाच्या व्याप्तीतील सुमारे 10 शेतकऱयांची जमीन स्वाधिन करून घेण्यात आली होती. मात्र, या मोबदल्यात मिळणारी 12 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱयांना मिळाली नाही. यासाठी शेतकरी कार्यालयाकडे गेले असता कार्यालयातील अधिकारी रक्कम देण्यास टाळाटाळ करीत होते. यामुळे शेतकऱयांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार न्यायालयाने सदर कार्यालयावर जप्तीचे वॉरंट जारी केला होते. मात्र, याकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याने शुक्रवार 4 रोजी हिडकल डॅम येथील विशेष भूसंपादन कार्यालयावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.