मंत्री उमेश कत्ती : हिडकल डॅम परिसरात नियोजन : हुक्केरीत ता. पं. सभागृहात तालुका, जिल्हास्तरीय अधिकाऱयांची बैठक
वार्ताहर /हुक्केरी
तालुक्यातील हिडकल डॅमनजीक 100 कोटी रुपये खर्चातून हायटेक उद्यान निर्मिती करण्यात येणार आहे. याठिकाणी वृंदावन उद्यानासाठी संगीत कारंजे, बोटींग, पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी विविध सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी परिसरातील 342 एकर जमिनीची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती मंत्री उमेश कत्ती यांनी दिली.
हुक्केरी येथील तालुका पंचायत सभाभवनात पार पडलेल्या हायटेक उद्यान निर्मितीसंबंधी जिल्हा व तालुकास्तरीय अधिकाऱयांच्या बैठकीत बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मंत्री कत्ती होते. यावेळी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यनिवार्हक अधिकारी दर्शन एच. व्ही. यांनी उद्यानासंबंधी माहिती व आराखडा सादर केला.
हॉटेल, बोटिंगची सुविधा
मंत्री कत्ती यांनी, हिडकल डॅमपासून धुपदाळ जलसंग्रहालयापर्यंतचे अंतर 15 कि.मी. आहे. या परिसरात सुमारे 22 छोटे-छोटे डेंगर भाग आहेत. त्यातील 12 ठिकाणी हॉटेल उभारणी व बोटिंगची व्यवस्था करण्याची आपली कल्पना असल्याचे सांगितले. यावेळी ऍडेक कंपनीचे अभियंते निरंजन उदोशी यांनी उद्यानासंबंधी आराखडा सादर केला.
पर्यटनाला चालना देणार
उद्यानाच्या डाव्या बाजूला 242 एकर प्रदेशात व उजव्या बाजूच्या 100 एकर अशा एकूण 342 एकर जमिनीत उद्यानासंबंधी विविध सोयी-सुविधा देण्यात येणार आहेत. सदर प्रदेशात ट्री-पार्क, उद्यान, पार्कींग व्यवस्था, रंगमंदिर, फूडप्लाजा, बाजार, पक्षीघाम, स्केटिंग सुविधा यासह विविध सुविधा पर्यटनाला चालना देण्यासाठी पुरविण्यात येणार आहेत. डॅमच्या उजव्या बाजूच्या जागेत रिसॉर्ट, हॉटेल, सायकलिंग व वॉकींग ट्रकची सोय करण्यात येणार असल्याचेही बैठकीत मांडण्यात आले.
या नियोजित सभेत जि. पं. अधिकारी एच. व्ही. दर्शन, विशेषाधिकारी राजशेखर पाटील, सीसीएफ विजयकुमार सालीमठ, डीएफओ हर्षाबानू, फलोद्यान अधिकारी महांतेश मुरगोड, पाटबंधारे विभाग अधीक्षक चंद्रहास बंडी, व्ही. एन. पाटील, तहसीलदार डॉ. डी. ए. हुग्गार, ता. पं. अधिकारी उमेश सिदनाळ व इतर अधिकारी उपस्थित होते.