वृत्तसंस्था/ कॅनबेरा
यजमान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघामध्ये सुरू असलेल्या ऍशेस मालिकेतील एकमेव कसोटी सामन्यात शनिवारी खेळाच्या तिसरा दिवसाअखेर इंग्लंडने पहिल्या डावात 297 धावा जमविल्या. इंग्लंड संघातील हिथर नाईटने नाबाद 168 धावांची खेळी केली. त्यानंतर दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱया डावात 2 बाद 12 धावा जमविल्या.
या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिला डाव 9 बाद 337 धावांवर घोषित केला. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 297 धावा झळकविल्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 40 धावांची आघाडी मिळविली. इंग्लंडने 8 बाद 235 या धावसंख्येवरून तिसऱया दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला आणि त्यांचे शेवटचे दोन गडी 65 धावांची भर घालत तंबूत परतले. हिथर नाईट 168 धावांवर नाबाद राहिली. इक्लेस्टोनने 34 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाच्या इलेसी पेरीने 3 गडी बाद केले.
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱया डावाला चांगली सुरूवात झाली नाही. त्यांनी आपले सलामीचे दोन्ही फलंदाज 12 धावांत गमविले. हिलीला खाते उघडता आले नाही. हेन्सने 4 धावा जमविल्या. इंग्लंडच्या ब्रंटने 4 धावात 2 गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाने 52 धावांची आघाडी मिळविली असून 4.5 षटकांचा खेळ झाला असताना मुसळधार पावसाला प्रारंभ झाल्याने पंचांनी तिसऱया दिवशीचा खेळ निर्धारित वेळेपेक्षा लवकर थांबविला. रविवारी सामन्यातील शेवटचा दिवस असून ऑस्ट्रेलियाचा संघ विजयासाठी प्रयत्न करेल.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया प. डाव 9 बाद 337 डाव घोषित, इंग्लंड प.डाव सर्व बाद 297, (नाईट नाबाद 168, इक्लेस्टोन 37, पेरी 3 बळी), ऑस्ट्रेलिया दु. डाव 4.5 षटकांत 2 बाद 12 (हिली 0, हेन्स 4, मुनी खेळत आहे 7, ब्रंट 2-4)